ती सुखात आहे का ?


 

वैशाखातला बांध

— सज्ञान मुलीने कायद्याच्या साक्षीने केलेलं लग्न, चौकीच्या पायरीवर आरोपी म्हणून उभा राहिलेला एक बाप, आणि "ती सुखात आहे का?" या एकाच प्रश्नाचं दहा पावसाळे लांबलेलं उत्तर

भाग १ : उंबरठ्यावरचा प्रश्न

"ज्योतिषात एका प्रश्नाचं उत्तर मिळतं का, गुरुजी — माझी मुलगी सुखात आहे का?"

दारात उभ्या असलेल्या त्या माणसाने आत पाऊलही न टाकता विचारलं. आवाज शांत होता. इतका शांत, की निखिलच्या हातातली नोंदवही क्षणभर तशीच राहिली.

वैशाख महिना होता. उन्हाळा ऐन भरात आला होता. नाशिकच्या जुन्या वाड्याच्या अंगणातली माती दुपारच्या उन्हाने भाजून निघत होती, आणि दालनातही एक कोरडा, तापलेला वारा अधूनमधून शिरत होता. अशा दिवसांत माणसं सहसा दुपारी बाहेर पडत नाहीत. पण हा माणूस — पन्नाशी उलटलेला, खादीचा साधा सदरा, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, पायांत झिजलेल्या वहाणा, वेळेच्या आधीच म्हातारा झलेला — भर उन्हातून चालत आला होता. त्याच्या हातात एक जुनं, कापडात गुंडाळलेलं पुडकं होतं.

समर्थांनी वर पाहिलं. त्या माणसाच्या चेहऱ्याकडे त्यांनी काही क्षण नुसतं बघितलं — आणि मग हळूच म्हणाले, "आत या. उन्हातून आलात. आधी पाणी घ्या."

तो माणूस आत आला. खुर्चीत बसला. पाण्याचा पेला त्याने दोन्ही हातांनी धरला — आणि निखिलच्या लक्षात आलं, त्याचे हात अगदी स्थिर होते. थरथर नाही, कंप नाही. पण त्या स्थिरतेतच काहीतरी होतं — जसं वादळ यायच्या आधी झाडं स्तब्ध होतात, तशी स्थिरता.

"नाव सांगा," समर्थ म्हणाले.

"भाऊसाहेब जोशी. इगतपुरीजवळचं गाव.  मुख्याध्यापक. तीस वर्षं पोरं शिकवली." तो क्षणभर थांबला. "स्वतःची पोरगी मात्र... राहून गेली."

त्याने हातातलं पुडकं टेबलावर ठेवलं. कापड उलगडलं. आत एक जुनी जन्मपत्रिका होती — कडा पिवळ्या पडलेल्या, घडीच्या जागी कागद विरत आलेला. पण ती पत्रिका नीट, काळजीने जपलेली होती. जशी कुणीतरी रोज हाताळत असावी.

"ही माझ्या मुलीची पत्रिका. सरिता. आज ती एकोणतीस वर्षांची आहे. तीन वर्षांपूर्वी तिने लग्न केलं — कोर्टात, कायद्याच्या साक्षीने, सगळं रीतसर. तेव्हापासून तिचा आवाजही ऐकलेला नाही." भाऊसाहेबांनी चष्मा काढला, सदऱ्याच्या टोकाने पुसला, पुन्हा घातला. "मला भविष्य नको, गुरुजी. फळ नको, उपाय नको, काही नको. मला फक्त एकच सांगा — ती जिथे आहे, तिथे ती सुखात आहे का?"

दालनात शांतता पसरली. बाहेर वैशाखाचं ऊन रणरणत होतं.

समर्थांनी ती पत्रिका हातात घेतली नाही. आधी त्यांनी विचारलं — "ती का दुरावली, हे सांगाल का? पत्रिका वाचण्याआधी मला माणूस वाचायचा असतो."

भाग २ : ज्याला घडवायला घेतलं, तो

भाऊसाहेब बराच वेळ गप्प बसले. मग बोलू लागले — सावकाश, मोजून, जसा शिक्षक फळ्यावर अवघड गणित मांडतो तसं.

"मिलिंद कांबळे. माझा कॉलेजपासूनचा मित्र. अनेक वर्षांची मैत्री. आम्ही एकत्र शिकलो, एका खोलीत राहिलो, एकमेकांचे डबे वाटून खाल्ले. जात वेगळी होती — पण गुरुजी, आमच्या मैत्रीत ती कधी आलीच नाही. मी त्याच्या वस्तीत जेवलोय, तो माझ्या घरी पंगतीला बसलाय. माझ्या शाळेत मी तीस वर्षं सगळ्या जातींची पोरं मांडीवर घेऊन शिकवली. जात हा शब्द माझ्या आयुष्यात फार उशिरा शिरला — आणि तोही मैत्रीतून नाही..." त्यांचा आवाज क्षणभर थांबला. "...चौकीच्या पायरीवरून शिरला. पण ते नंतर सांगतो. आधी मिलिंद कोण, ते ऐका."

समर्थांनी मान डोलावली.

"मिलिंद हुशार. वक्ता जबरदस्त. तो बोलायला उभा राहिला की सभा शांत व्हायची. पुढे तो त्याच्या भागाचा, त्याच्या समाजाचा नेता झाला — वस्तीत त्याचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. लोकांची कामं करायचा, अडल्यानडल्याला धावायचा. वस्तीत त्याच्याबद्दल आदर होता, आणि दराराही. पण या सगळ्या कर्तृत्वाला एक वाळवी लागली होती, गुरुजी — दारू. तरुणपणापासूनच. त्या व्यसनापायी त्याचा पहिला संसार मोडला — बायको पोरं घेऊन माहेरी निघून गेली. आणि तेव्हापासून, गेली पंधरा-वीस वर्षं, मी एकच उद्योग करत होतो — त्याला त्या विहिरीतून बाहेर काढायचा."

"तुम्ही?"

"मी. कारण मी मास्तर आहे ना, गुरुजी." भाऊसाहेबांच्या ओठांवर एक कडवट हसू आलं. "मास्तरला एक घमेंड असते — माणूस घडवता येतो, ही. अनेक वर्षं वर्गात मी वाया गेलेली म्हणून शिक्का बसलेली पोरं घडवली. मग हा मित्र का घडणार नाही? मी त्याला दवाखान्यात नेलं, व्यसनमुक्ती केंद्रात भरती केलं — दोनदा. तो सुटायचा, पुन्हा अडकायचा. लोक मला म्हणायचे, 'जोशी गुरुजी, नाद सोडा त्याचा.' मी म्हणायचो, 'बुडणाऱ्याचा हात सोडणारा मी मास्तर कसला?' आणि म्हणूनच मी त्याला घरी आणत राहिलो. सणावाराला, अडीअडचणीला. मला वाटायचं, घरचं जेवण, घरची माणसं, घरची माया — हेच त्याचं खरं औषध आहे."

ते थांबले. दालनातला तापलेला वारा क्षणभर थांबल्यासारखा वाटला.

"आणि माझ्या त्या औषधाच्या बाटलीतून, गुरुजी... माझी मुलगीच उचलली गेली."

निखिल स्तब्ध झाला.

"सरिता तेव्हा शिक्षण संपवून घरीच होती. मिलिंद घरी यायचा, तेव्हा ती त्याचं बोलणं ऐकत बसायची. त्याची भाषणं, त्याच्या वस्तीतल्या कामांच्या गोष्टी, त्याचा तो 'पडलेला पण झुंजणारा' चेहरा. आणि एक दिवस तिने आम्हाला सांगितलं — ती मिलिंदशी लग्न करणार आहे. माझ्या मित्राशी. माझ्याच वयाच्या माणसाशी. मी तिला म्हणालो, 'अगं, तो व्यसनी आहे, त्याचा एक संसार मोडलाय, तो माझ्या वयाचा...' तर ती म्हणाली — 'बाबा, तुम्हीच तर शिकवलंत ना, पडलेल्या माणसाचा हात सोडायचा नसतो? तुम्ही त्यांना वीस वर्षांत सुधारू शकला नाहीत. मी सुधारवीन. माझं प्रेम आहे त्यांच्यावर.'" भाऊसाहेबांनी डोळे मिटले. "गुरुजी, माझीच शिकवण, माझ्याच घरात, माझ्यावरच उलटली. त्या दिवशी मला कळलं — शब्द पेरताना मास्तरने फार जपून पेरावेत. कुठलं बी कुठे रुजेल, सांगता येत नाही."

भाग ३ : चौकीच्या पायरीवरचा मास्तर

"मग तुम्ही थांबवलं नाहीत?" निखिलने न राहवून विचारलं.

"थांबवणार कसं?" भाऊसाहेबांनी निखिलकडे शांतपणे पाहिलं. "ती सज्ञान होती. सव्वीस वर्षांची. शिकलेली. कायदा तिच्या बाजूने होता — आणि खरं सांगायचं तर, असायलाच हवा. सज्ञान मुलीला तिचा जोडीदार निवडण्याचा हक्क कायद्याने दिलाय, आणि तो योग्यच आहे — हे मी मास्तर म्हणून वर्गात शिकवलेलं आहे, गुरुजी. फक्त ते कलम आपल्याच घराच्या उंबरठ्यावर येऊन उभं राहिलं, की त्याचं वजन किती असतं, हे त्या वैशाखात कळलं. घरात रडारड झाली, नातेवाईक जमले, समजावण्या झाल्या. आणि एका सकाळी सरिता घरातून निघून गेली. आठवड्याने कोर्टात रजिस्टर लग्न झालं — साक्षीदार, सह्या, शिक्के. सगळं कायदेशीर. आम्हाला साधी खबरही नाही. मी हतबल होतो — आणि हतबलपणालाही कायद्याची मोहोर होती."

ते थांबले. मग हळू आवाजात पुढे बोलू लागले —

"पंधरा दिवसांनी बायको म्हणाली, 'एकदा जाऊन या. भांडायला नको — फक्त सांगून या, दार उघडं आहे.' मी गेलो. मिलिंदच्या वस्तीत. त्याच वस्तीत, जिथे मी आजवर पाहुणा म्हणून, मित्र म्हणून गेलो होतो. दार सरिताने उघडलं. मला बघून तिचा चेहरा कठोर झाला. आतून मिलिंद आला. मी हात जोडून एवढंच म्हणालो — 'भांडायला नाही आलो. पोरी, तुझं दार तू लावून घेतलंस, माझं उघडं आहे, एवढंच सांगायला आलोय.' त्यावर मिलिंद पुढे झाला आणि म्हणाला — 'भाऊ, हे रोज-रोज नको. आम्हाला त्रास होतोय.' मी म्हणालो, 'रोज कुठे? पहिल्यांदाच तर आलोय.' तो काही बोलला नाही. मी परत आलो."

"आणि मग?"

"आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, गुरुजी..." भाऊसाहेबांचा आवाज आता पूर्ण सपाट झाला — इतका सपाट, की तो सपाटपणाच ओरडून सांगत होता की आत काय खोल आहे. "...माझ्या घरी पोलीस चौकीतून निरोप आला. जोशी गुरुजींना उद्या सकाळी चौकीत बोलावलंय. तक्रार दाखल झाली आहे."

दालनात इतकी शांतता पसरली, की बाहेरच्या उन्हात तापणाऱ्या पत्र्याचा चटचट आवाजही ऐकू येऊ लागला.

"तक्रार. माझ्याविरुद्ध. सहीसकट. नवविवाहित जोडप्याला धमकावणं, त्रास देणं, दबाव आणणं. खाली दोन नावं — मिलिंद कांबळे. आणि सरिता मिलिंद कांबळे." भाऊसाहेबांनी चष्म्याआडून समर्थांकडे पाहिलं. "मी दुसऱ्या दिवशी चौकीत गेलो. चाळीस वर्षं ज्या तालुक्यात मला लोक रस्त्यात थांबवून नमस्कार करतात, त्या तालुक्याच्या चौकीत, मी — जोशी गुरुजी — आरोपीच्या बाकावर उभा होतो. हवालदाराने कागद वाचून दाखवला. साहेबांनी समज दिली — 'गुरुजी, तुमच्याबद्दल आदर आहे, म्हणून समजावर सोडतोय. पण पुन्हा तिकडे जाल, तर मामला वाढेल. समोरचा माणूस साधा नाही — त्या भागाचा नेता आहे, आणि प्रकरण पुढे गेलं तर कलमंही वेगळी लागू शकतात. तुम्हाला झेपणार नाही ते. सही करा आणि घरी जा.' मी सही केली, गुरुजी. तीस वर्षं हजारो दाखल्यांवर 'मुख्याध्यापक' म्हणून सही केली — आणि त्या दिवशी 'समज मिळाली' म्हणून सही केली. आणि चालत घरी आलो. वाटेत माझ्या शाळेतली दोन माजी पोरं भेटली — नमस्कार केला त्यांनी. मी मान डोलावली. त्यांना काय माहीत, हा मास्तर आत्ता कुठून येतोय."

निखिलच्या डोळ्यांत पाणी तरारलं. त्याने ते लपवायला मान वळवली. भाऊसाहेब मात्र कोरडेच होते.

"गुरुजी, एक गोष्ट स्पष्ट करतो — कारण ती न करता ही कहाणी सांगणं म्हणजे अर्धं खोटं बोलणं." भाऊसाहेब ताठ बसले. "त्या दिवशी मला धाक कशाचा होता, हे मला विचारा. कायद्याचा? नाही. कायदा शोषितांची ढाल म्हणून बनलाय, आणि तो असायलाच हवा — माझ्या वस्तीतल्या विद्यार्थ्यांच्या पिढ्या मी बघितल्यात, त्या ढालीची गरज काय असते, हे मला कुणी शिकवायला नको. जातीचा धाक? नाही — जिच्या पंगतीला मी तीस वर्षं बसलो, तिचा धाक कसला? धाक होता तो एका गोष्टीचा — माझा मित्र ती ढाल हातात घेऊन माझ्यासमोर उभा होता. ज्या हाताला मी वीस वर्षं विहिरीतून वर ओढत होतो, त्या हाताने ढाल उगारली होती — आणि ढालीमागून माझी मुलगी बघत होती. दोष ढालीचा नसतो, गुरुजी. दोष कायद्याचा नसतो, जातीचा नसतो. दोष — ढाल कशावर उगारायची, हे विसरलेल्या हाताचा असतो. आणि तो हात माझ्या मित्राचा होता, म्हणून जखम खोल आहे. एवढंच."

"भाऊसाहेब..." समर्थांचा आवाजही किंचित जड झाला.

"त्या दिवसानंतर मी तिकडे गेलो नाही. जाऊच शकत नव्हतो — गेलो असतो तर पुढचा कागद तयार होता. माझी बायको रोज रात्री देवापुढे रडते. मला रडायला येत नाही. तीस वर्षं मास्तरकी केली ना — वर्गात मास्तरने रडायचं नसतं, हे हाडात मुरलंय. पण डोळ्यांत न येणारं पाणी कुठे जातं, हे मला विचारा. ते आतल्या आत मुरतं. आणि आतली जमीन रोज थोडी थोडी खचत जाते."

त्यांनी पत्रिका समर्थांच्या दिशेने सरकवली.

"म्हणून आलोय. रागाने नाही, तक्रारीने नाही. जिच्या सहीने मी आरोपी झालो, तिच्यासाठीच आलोय. कारण राग हा वरचा थर असतो, गुरुजी. त्याच्या खाली फक्त एकच प्रश्न उरलाय, तीन वर्षं झोपू देत नाही असा — माझी पोरगी सुखात आहे का?"

भाग ४ : पत्रिका काय बोलली

समर्थांनी ती पिवळी पत्रिका हातात घेतली. उलगडली. आणि बराच वेळ ते तिच्यात बुडून गेले. निखिलने पाहिलं — त्यांची नजर सप्तम भावाच्या कस्पवर स्थिरावली, मग नक्षत्र-स्वाम्यांच्या नोंदींवरून फिरली, मग दशांच्या पानावर थांबली. त्यांच्या कपाळावर हळूहळू एक सूक्ष्म आठी उमटत गेली — जी लपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण भाऊसाहेबांच्या शिक्षकी नजरेने ती टिपलीच.

"सांगा, गुरुजी. मी उत्तर ऐकायला तयार होऊनच आलोय."

समर्थांनी पत्रिका खाली ठेवली. मग ते सावकाश बोलू लागले.

"भाऊसाहेब, तुमच्या मुलीच्या पत्रिकेत विवाहाचं दार उघडणारा जो सूत्रधार आहे — सप्तम कस्पचा सब — तो शनी आहे. आणि हा शनी राहूच्या नक्षत्रात उभा आहे. आता हे शब्द बाजूला ठेवा, आणि त्यांचा अर्थ ऐका. शनी म्हणजे काळाने पिकलेलं — वयाने मोठं, जुनं, आधी होऊन गेलेलं. तिच्या पत्रिकेनेच जन्मापासून सांगून ठेवलं होतं — हिचा जोडीदार चाकोरीतला नसेल; वयाने खूप मोठा असेल. आणि राहू —" समर्थ क्षणभर थांबले, "— राहू दोन गोष्टींचा धनी आहे, भाऊसाहेब. एक — सीमोल्लंघन. रीत, वय, समाजाच्या रेषा ओलांडणं. आणि दोन — धुंदी. नशा. जे प्यायल्यावर माणूस स्वतःचा राहत नाही, ते सगळं राहूच्या झोळीत येतं. तिच्या विवाहाच्या दारावर या राहूची दुहेरी सावली आहे — त्या नात्याने रेषाही ओलांडल्या, आणि त्या नात्यात धुंदीही आहे."

भाऊसाहेब ताठ झाले. "म्हणजे... दारू..."

"पत्रिका बाटली दाखवत नाही, भाऊसाहेब — ती प्रवृत्ती दाखवते. आणि ती पुढेही बोलते. या शनीचे धागे षष्ठ स्थानाशी जोडलेले आहेत — षष्ठ म्हणजे कलह, वाद, खटले, चौकीची पायरी. तुम्ही आज जे सांगितलंत — ती तक्रार, ती सही — ते पत्रिकेत आधीच लिहून ठेवलेलं होतं. आणि हे धागे व्यय स्थानालाही भिडतात — व्यय म्हणजे गुपचूप गिळलेल्या अश्रूंचं घर. आणि सगळ्यात महत्त्वाचं — या विवाहाच्या दारावर एक जुनी सावली आहे. शनी म्हणजे 'आधीचं', हे मी म्हणालो ना? तिचं लग्न ज्या घरात झालं, ते घर रिकामं नव्हतं. तिथे आधीच एक मोडलेला संसार राहून गेला होता — आणि मोडलेला संसार विझलेल्या चुलीसारखा असतो. आग दिसत नाही, पण राख गरम असते. ती राख त्या घरात अजून आहे."

"म्हणजे मिलिंदची पहिली बायको..."

"पत्रिका नावं सांगत नाही. ती फक्त एवढं सांगते —" समर्थांचा आवाज मृदू, पण ठाम होता, "— तुम्ही जो प्रश्न घेऊन आलात, त्याचं उत्तर 'नाही' असं आहे. तुमची मुलगी सुखात नाही, भाऊसाहेब. ती ज्याला सुधारवायला गेली, त्याची धुंदी परतते आहे — आणि तिला आता कळतंय की वीस वर्षांत बाप जे करू शकला नाही, ते प्रेमाच्या भरात आपण करू, हा हिशेब कोवळा होता. ती रोज झगडते आहे — बाहेरून त्या धुंदीशी आणि त्या जुन्या राखेशी, आणि आतून स्वतःच्या निर्णयाशी. आणि तिचं सगळ्यात मोठं दुःख हे की तिला हे कुणाला सांगताही येत नाही. कारण ज्यांना सांगावं, त्यांच्याविरुद्ध तिने स्वतःच्या हाताने... चौकीत कागद केला आहे. माणूस चूक कबूल करायला सगळ्यात जास्त कचरतो कुठे, माहितीये? — जिथे त्याने सगळ्यात मोठ्या आवाजात 'मी बरोबर आहे' म्हणून सही केलेली असते तिथे."

भाऊसाहेबांनी डोळे मिटले. बराच वेळ ते तसेच बसून राहिले. त्यांच्या घशाची घाटी एकदा वरखाली झाली. पण डोळे जेव्हा उघडले, तेव्हा ते कोरडेच होते.

"पुढे सांगा," ते म्हणाले. फक्त दोन शब्द.

भाग ५ : दहा पावसाळ्यांचं भाकीत

समर्थांनी दशेचं पान पुन्हा उघडलं.

"भाऊसाहेब, माणसाच्या आयुष्यात ग्रहांच्या दशा आळीपाळीने राज्य करतात. तुमच्या मुलीच्या आयुष्यात नुकतीच शनीची महादशा सुरू झाली आहे — तिच्या लग्नाच्या सुमारासच ती लागली. शनीची दशा एकोणीस वर्षांची असते. आणि शनी हा शिक्षक आहे — पण तुमच्यासारखा प्रेमळ मास्तर नव्हे. शनी हा घडवण्यासाठी घासणारा शिक्षक आहे. तो सोपे धडे देत नाही. तो असे धडे देतो, जे विसरता येत नाहीत."

"किती काळ, गुरुजी?" भाऊसाहेबांनी थेट विचारलं. "मला आकडा सांगा. मी हिशेबाचा माणूस आहे."

समर्थांनी त्यांच्याकडे बघितलं — आणि त्या नजरेत करुणा होती.

"शनीच्या महादशेत आता क्रमाने बुध, केतू आणि शुक्र यांची अंतर्दशा-वर्षं येतील. ही वर्षं तिच्या संसाराची सगळ्यात कसोटीची वर्षं असतील. शुक्र हा भोगविलासाचा ग्रह — त्याच्या वर्षांत ती धुंदी पुन्हा जोर धरेल, ती जुनी सावली त्या घरात परत गडद होईल, आणि तिचा एकटेपणा खोल जाईल. पण याच काळात, भाऊसाहेब, तिच्या पत्रिकेतला एक ग्रह तिच्या पाठीशी उभा आहे — गुरु. तिच्या संतती-स्थानाशी गुरूचा शुभ संबंध आहे. या कसोटीच्या वर्षांतच तिच्या घरात तीन वेळा पाळणा हलेल."

"तीन?" भाऊसाहेबांचा आवाज प्रथमच कापला. "तीन नातवंडं... आणि मी एकाचंही तोंड..."

"थांबा. पुढचं ऐका." समर्थ पुढे झुकले. "ती मुलंच तिला त्या वर्षांत जगवतील. जिथे नवऱ्याचा आधार कमी पडेल, तिथे तीन कोवळे जीव तिला रोज सकाळी उठायचं कारण देतील. आणि मग —" समर्थांचं बोट दशेच्या पानावर पुढे सरकलं, "— शुक्राची वर्षं संपल्यावर रवीचं वर्ष येईल. रवि म्हणजे सूर्य. सूर्य म्हणजे तेज, स्वाभिमान — आणि त्याचं दुसरं टोक, अहंकार. तुमच्या मुलीच्या पत्रिकेत रवि राहूच्या दृष्टीत आहे — म्हणून तिचा स्वाभिमान फुगून अहंकार झाला. 'बाबा वीस वर्षांत जे करू शकले नाहीत, ते मी करीन' — हे वाक्य, आणि त्या तक्रारीखालची ती सही — ती ती नव्हती, तो हा फुगलेला रवि होता. पण शनीच्या महादशेत जेव्हा रवीचं वर्ष येतं, तेव्हा शनी त्या सूर्याला जात्यात धरतो. अहंकाराचा फुगा शनीच्या दगडाखाली फुटतो. त्या वर्षात तिला पहिल्यांदा स्पष्ट दिसेल — आपण कुणाकुणाला दुखावलं, आणि कुणाच्या नावावर काय काय कागद केले."

दालनात कुणीच बोललं नाही. समर्थ पुढे बोलत राहिले — आता त्यांचा आवाज एखाद्या मंत्रासारखा खोल झाला होता.

"रवीच्या वर्षानंतर चंद्राचं दीड वर्ष येईल. चंद्र म्हणजे आई, माहेर, आणि मनाच्या तळातली ओढ. त्या दीड वर्षात तिला रोज तुमचं घर आठवेल. अंगणातली तुळस आठवेल. आईच्या हातची चव आठवेल. आणि चंद्राचं वर्ष संपून मंगळाचं वर्ष लागताच —" समर्थ थांबले. त्यांनी भाऊसाहेबांच्या डोळ्यांत थेट पाहिलं. "— मंगळ म्हणजे घाव. निर्णायक तुटणं. त्या घरातला तिचा शेवटचा धागा त्या वर्षी तुटेल. हिशेब मांडा, भाऊसाहेब — तुम्ही हिशेबाचे माणूस आहात. बुध, केतू, शुक्र, रवि, चंद्र — ही वर्षं मोजा. आजपासून बरोबर दहा वर्षांनी, एका पावसाळ्यात, तुमच्या घरातला फोन वाजेल. पलीकडे तुमची मुलगी असेल. तीन मुलांची आई झालेली. आणि ती एकच वाक्य बोलेल — 'बाबा, मला घ्यायला या.'"

भाऊसाहेब दगडासारखे स्तब्ध बसून राहिले. मग हळूच म्हणाले — "दहा वर्षं... गुरुजी, तेव्हा मी बासष्ट वर्षांचा असेन. तोपर्यंत मी असेन कशावरून?"

"तो हिशेब माझ्या अधिकारातला नाही, आणि मी तो कधी मांडत नाही," समर्थ शांतपणे म्हणाले. "पण मी तुम्हाला एक वेगळा हिशेब देतो. ज्या बापाला दहा वर्षांनी यायचा फोन आधीच ऐकू आलाय — तो बाप तो फोन उचलल्याशिवाय जात नसतो. वाट पाहणं हेच त्याचं औषध होतं."

भाग ६ : वैशाखातला बांध

"मग मी आता काय करू?" भाऊसाहेबांनी विचारलं. "कायद्याने माझे हात बांधलेत. तिच्या दाराशी मी जाऊ शकत नाही — गेलो तर पुढचा कागद तयार आहे. दहा वर्षं नुसती बोटं मोजत बसू?"

समर्थ उठले. खिडकीपाशी गेले. बाहेर वैशाखाचं रणरणतं ऊन माळावर पसरलं होतं.

"भाऊसाहेब, तुमचं गावाकडे शेत आहे?"

"आहे. लहानसं. वडिलोपार्जित."

"मग तुम्हाला वेगळं समजवायला नको." समर्थ वळले. "शेतकरी बांध कधी घालतो, सांगा. पाऊस पडत असताना?"

"नाही. आत्ता. वैशाखातच. उन्हाळ्यात बांध बांधून, दुरुस्त करून ठेवायचा असतो. फुटलेल्या जागा लिंपायच्या असतात. कारण पाऊस आल्यावर बांध घालायला वेळ मिळत नाही — तेव्हा बांध तयार नसेल, तर आलेलं पाणी वाहून जातं."

"बस्स. हेच तुमचं उत्तर आहे." समर्थ पुन्हा समोर येऊन बसले. "आभाळाकडे बघा. ढग कधी जमवायचे, पाऊस कधी पाडायचा — हे शेतकऱ्याच्या हातात नसतं. तसंच सरिता कधी परतणार, हे तुमच्या हातात नाही — ते काळाच्या, तिच्या दशांच्या हातात आहे. आणि तुमच्या बाबतीत तर कायद्यानेही हेच सांगितलंय — ढगांच्या मागे धावायचं नाही. पण भाऊसाहेब, शेतकऱ्याच्या हातात एक गोष्ट कायम असते — बांध. पाऊस पडेल तेव्हा थेंबन्‌थेंब धरून ठेवणारा बांध तयार ठेवणं, एवढंच त्याचं काम. ही पुढची दहा वर्षं तुम्ही एकच करायचं — बांध जपायचा."

"म्हणजे नेमकं...?"

"म्हणजे तीन गोष्टी. पहिली — मनात तिच्याविषयी कडवटपणाची भेग पडू देऊ नका. आणि तुमच्यासाठी ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे, कारण तुमच्या जखमेवर एक सरकारी कागद आहे. दहा वर्षांनी ती परतेल, तेव्हा ती थकलेली, मोडलेली, अपराधाने वाकलेली असेल. त्या क्षणी तुमच्या मनाच्या बांधाला जर रागाची एक जरी भेग असेल — 'तूच ना, जिने माझ्यावर तक्रार केली होतीस' — तर तिचं परतणं त्या भेगेतून वाहून जाईल. ते वाक्य म्हणजे बांधाला भगदाड. ते दहा वर्षं रोज गिळायचं. दुसरी — घरातलं तिचं पान कधी उचलू नका. तिची खोली, तिच्या वस्तू, भिंतीवरचा फोटो — जागचं हलवू नका. बांध म्हणजे नुसती माती नव्हे — बांध म्हणजे 'पाणी येणार आहे' हा विश्वास."

"आणि तिसरी?"

"तिसरी गोष्ट म्हणजे उपाय. एकच देतो — पण त्यामागचं कारण नीट ऐका." समर्थांनी पत्रिकेवर हात ठेवला. "तिचं हे सगळं भोगणं शनीच्या काळातलं आहे. आणि शनीचा स्वभाव लक्षात घ्या — त्याला चकाकतं दान नको असतं, गोड स्तुती नको असते. शनीला एकच भाषा कळते — सेवा. आणि तीही कुणाची? ज्यांना जगाने वाऱ्यावर सोडलंय त्यांची. निराधारांची, कष्टकऱ्यांची, ज्यांचं दार बंद झालंय अशांची. म्हणून उपाय हा — दर शनिवारी, तुमच्या तालुक्यातल्या महिलाश्रमात जा. तिथे ज्या स्त्रिया आहेत — कुणी सासरने टाकलेल्या, कुणी नवऱ्याच्या व्यसनाने उद्ध्वस्त झालेल्या, कुणाला माहेरचं दारही उरलेलं नाही अशा — त्यांच्यासाठी जमेल ती सेवा करा. कुणाला औषध आणून द्या, कुणाच्या मुलांना अक्षरं शिकवा — मास्तर आहात, तुमच्याकडे द्यायला विद्या आहे. आणि प्रत्येक शनिवारी, तिथून निघताना, मनातल्या मनात एवढंच म्हणा — 'ही सेवा माझ्या सरितेच्या नावाने.'"

भाऊसाहेब एकटक ऐकत होते.

"आता याचं कारण," समर्थ पुढे म्हणाले. "हा उपाय तिचं भोगणं थांबवणार नाही — ते मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. शनीची शाळा तिला पूर्ण करावीच लागेल. हा उपाय तुमच्यासाठी आहे. ज्या मुलीपर्यंत तुमची माया पोचू शकत नाही — कायद्याने आणि काळाने, दोघांनीही ती वाट अडवली आहे — तिच्यासारख्याच परिस्थितीत असलेल्या दुसऱ्या लेकींपर्यंत ती पोचवायची. म्हणजे माया साचून तिचं विष होत नाही, ती वाहती राहते. वाहतं पाणी नासत नाही, भाऊसाहेब — साचलेलं नासतं. दहा वर्षं तुमच्या काळजातली माया साचून राहिली, तर तिचं रूपांतर कडवटपणात होईल — आणि बांध आतूनच फुटेल. आणि दुसरं — दर शनिवारी जेव्हा तुम्ही एखाद्या व्यसनाने उद्ध्वस्त झालेल्या घरातल्या लेकीच्या मुलाला अक्षरं शिकवाल, तेव्हा कुठेतरी, कोणत्यातरी वस्तीत, तीन मुलांना जोजवत जागणाऱ्या तुमच्या लेकीच्या वाट्याचा शनी एका बापाची सेवा नोंदवून घेत असेल. ग्रहांचा हिशेब आपल्या हिशेबासारखा नसतो — पण तो असतो, हे नक्की."

भाऊसाहेब उठले. त्यांनी पत्रिका पुन्हा कापडात गुंडाळली — त्याच जपणुकीने. मग हात जोडून म्हणाले —

"गुरुजी, मी आलो तेव्हा एक प्रश्न घेऊन आलो होतो. जाताना दहा वर्षांचं काम घेऊन जातोय." उंबरठ्यावर ते क्षणभर थांबले. "उत्तर 'नाही' आहे, हे ऐकून मला काय वाटलं, विचाराल तर — बरं वाटलं. विचित्र वाटेल, पण खरं सांगतो. ती सुखात नाही, हे ऐकणं परवडलं. पण ती सुखात असती आणि तरीही तिला बापाची आठवण येत नसती — ते ऐकणं परवडलं नसतं."

आणि ते वैशाखाच्या उन्हात चालत निघून गेले. निखिल दारात उभा राहून बघत राहिला — एक बाप, हातात मुलीची पत्रिका, आणि खांद्यावर दहा वर्षांची वाट.

भाग ७ : दहा वर्षांनी

दहा वर्षं उलटली.

त्या वर्षीचा श्रावण धुवाँधार बरसत होता. सकाळपासून पावसाची संततधार लागली होती, आणि वाड्याच्या पन्हळीतून पाणी ओसंडत होतं. निखिलचे केस आता बरेच पिकले होते; समर्थांच्या चालीत आता काठीची साथ होती.

आणि त्या दिवशी सकाळी, दारात एक माणूस उभा राहिला — भिजलेला, हातात जुनी छत्री जिने त्याला अर्धंच झाकलं होतं.

"भाऊसाहेब!" निखिलने त्यांना लगेच ओळखलं. दहा वर्षांत ते थकले होते. पण डोळे — डोळे आज वेगळे होते.

"गुरुजी..." ते आत आले. खुर्चीत बसलेही नाहीत. उभ्याउभ्याच म्हणाले — "काल रात्री फोन वाजला."

समर्थांनी हातातली पोथी मिटली.

"अकरा वाजून गेले होते. मी नुकताच शनिवारच्या आश्रम-फेरीहून येऊन झोपलो होतो — दहा वर्षांत एकही शनिवार चुकवला नाही, गुरुजी, एकही नाही. फोन वाजला. मी उचलला. पलीकडून आधी काही ऐकूच येईना — फक्त श्वास. मग एक आवाज आला. दहा वर्षांनी ऐकत होतो, तरी पहिल्या अक्षरालाच ओळखला." भाऊसाहेबांचा आवाज पूर्ण शांत होता — त्या दिवशीसारखाच. पण त्यांचे हात, दहा वर्षांपूर्वी पाण्याचा पेला स्थिरपणे धरणारे हात, आज थरथरत होते. "ती म्हणाली — 'बाबा... मला घ्यायला या.'"

निखिलच्या अंगावर सरसरून काटा आला.

"धुंदीने त्या घराचा घास घेतलाच शेवटी, गुरुजी. तुम्ही म्हणाला होतात तशी ती जुनी सावलीही त्या घरात परत आली. आणि काल त्या माणसाने निवड केली — माझ्या मुलीला, तिच्या तीन मुलांसह, दार दाखवलं. ती रात्रभर एका मैत्रिणीकडे होती. तिथून तिने फोन लावला. नंबरही न बघता — म्हणजे दहा वर्षं तो नंबर तिच्या पाठ होता."

"तुम्ही काय म्हणालात तिला?" समर्थांनी विचारलं.

"मी..." भाऊसाहेब क्षणभर थांबले. "गुरुजी, दहा वर्षं मी या फोनची तयारी केली. काय बोलायचं याची हजार वाक्यं रचली आणि मोडली. पण काल फोनवर मी फक्त चारच शब्द बोललो — 'पत्ता सांग. निघतोय मी.' बस्स. ना प्रश्न, ना जाब, ना 'का', ना 'कसं'. ती पलीकडे रडत होती — घळाघळा. म्हणत होती, 'बाबा, मी तुमच्यावर चौकीत...' मी तिला थांबवलं. म्हणालो — 'ते सगळं नंतर. आधी पत्ता.'"

समर्थांच्या चेहऱ्यावर एक खोल, शांत समाधान पसरलं. "मग आता इथे का थांबलात, भाऊसाहेब? निघा."

"निघालोच आहे. पण जाताना पाय आपोआप इकडे वळले." भाऊसाहेबांनी हात जोडले — आणि ते वाकून समर्थांच्या पायांना स्पर्श करणार, इतक्यात समर्थांनी त्यांना खांद्याला धरून थांबवलं.

"नमस्कार मला नको, भाऊसाहेब. तुमच्या त्या बांधाला करा — जो तुम्ही दहा वैशाख न चुकता लिंपत राहिलात." समर्थ हळूच म्हणाले. "मी फक्त पाऊस कधी येईल ते सांगितलं. पाणी धरून ठेवणारा बांध तुम्ही बांधलात."

भाऊसाहेब वळले. दारापाशी गेले. बाहेर श्रावण कोसळत होता. आणि तेव्हा निखिलने पाहिलं — ते दारातच थबकले. मागे न वळता, पाठमोरेच, ते बोलले —

"गुरुजी... एक सांगू? काल रात्री फोन ठेवल्यावर बायको ओक्साबोक्शी रडली. आनंदाने. मला काल रात्रीही रडू आलं नाही. आत्ताही येत नाहीये. चाळीस वर्षांच्या मास्तरकीने डोळे कायमचे कोरडे करून टाकले वाटतं." त्यांचा आवाज किंचित हलला — पहिल्यांदा, दहा वर्षांत पहिल्यांदा. "पण आतून काहीतरी काठोकाठ भरून आलंय, एवढं खरं."

आणि ते पावसात उतरले. निखिल दारात उभा राहून बघत राहिला — एक बाप, अर्धवट झाकणारी छत्री सांभाळत, भरल्या पावसातून रिक्षा स्टँडच्या दिशेने झपाझप चालत होता. दहा वर्षं वाट पाहिलेली गाडी आज सुटायची होती — आणि ती चुकवणं त्याला परवडणारं नव्हतं.

समर्थ खिडकीतून ते दृश्य बघत होते. ते हळूच पुटपुटले —

"बघ निखिल. आभाळ धो-धो रडतंय — आणि त्या बापाचे डोळे कोरडे आहेत. पण त्याचा बांध आज काठोकाठ भरलाय. थेंबही वाहून गेला नाही."

भाग ८ : भरलेलं अंगण

त्यानंतर सुमारे महिन्याने, एका स्वच्छ सकाळी, वाड्यासमोर एक रिक्षा थांबली.

आधी उतरले भाऊसाहेब. मग एक चाळिशीजवळची स्त्री — थकलेली, पण डोळ्यांत एक नवी, धुतलेली शांतता असलेली. आणि तिच्या मागोमाग तीन मुलं — मोठी मुलगी नऊ-दहा वर्षांची, मधला मुलगा सात-आठचा, आणि धाकटा जेमतेम चारचा, आजोबांचं बोट घट्ट धरलेला.

"गुरुजी, ही सरिता," भाऊसाहेब म्हणाले. "हिनेच हट्ट धरला — ज्यांनी बाबांना दहा वर्षं टिकवलं, त्यांना भेटायचंय."

सरिता पुढे आली. तिने वाकून नमस्कार केला. आणि मग ती बोलू लागली — अडखळत, पण थेट.

"समर्थजी... घरी आल्यावर आईने मला सगळं सांगितलं. बाबा दहा वर्षांपूर्वी इथे येऊन गेले होते, हे मला माहीतच नव्हतं. आणि..." तिचा आवाज दाटला. "...आणि दर शनिवारी ते आश्रमात का जायचे, हेही आईनेच सांगितलं. समर्थजी, मी त्यांच्याविरुद्ध चौकीत तक्रार केली होती. सहीसकट. माझ्या बापाला — ज्याने आयुष्यात मुंगीलाही धमकावलं नसेल, त्याला — मी 'धमकावणारा' ठरवलं. आणि ते? ते दर शनिवारी माझ्या नावाने दुसऱ्यांच्या मुलींची सेवा करत राहिले. मी त्यांच्यासाठी चौकीचं दार उघडलं — आणि त्यांनी माझ्यासाठी घराचं दार दहा वर्षं उघडं ठेवलं. माझी खोली जशीच्या तशी. भिंतीवरचा फोटोसुद्धा... जागचा हलला नव्हता." ती थांबली. डोळे पुसले. "मी विचारलं त्यांना — 'बाबा, तुम्ही मला एवढं माफ कसं केलंत?' तर म्हणाले — 'माफी कसली? हिशेबच नव्हता ठेवला, तर माफ काय करणार?' बस्स. एवढंच बोलले. ते जास्त बोलतच नाहीत, समर्थजी. पण..."

"...पण त्यांचं न बोलणंच सगळ्यात मोठ्याने बोलतं," समर्थांनी वाक्य पूर्ण केलं. "आम्हाला ठाऊक आहे, पोरी."

धाकटा नातू आजोबांचं बोट सोडून दालनभर फिरत होता. भाऊसाहेबांची नजर सारखी त्याच्या मागे धावत होती — आणि त्या नजरेत निखिलला दिसलं ते दहा वर्षांचं साठलेलं, आता वाहतं झालेलं पाणी. डोळ्यांत नव्हे — नजरेत.

जाताना सरिताने पुन्हा नमस्कार केला. समर्थ तिला एवढंच म्हणाले —

"पोरी, एकच लक्षात ठेव. तुझ्या बाबांनी दहा वर्षं बांध जपला, म्हणून आज तुझं परतणं वाया गेलं नाही. आता बांध जपायची पाळी तुझी — तुझ्या या तीन पिल्लांसाठी. आणि हो — पुढचं आयुष्य उभं करताना कायद्याची, माणसांची, जी जी मदत लागेल ती घे. कायदा ढाल आहे, पोरी — ती योग्य कामासाठी वापरली की माणसाला उभं करते. ग्रह दिशा दाखवतात; चालायचं मात्र माणसांच्या साथीनेच असतं."

भाग ९ : निखिल आणि समर्थ यांची चर्चा

रिक्षा दिसेनाशी झाल्यावर बराच वेळ निखिल खिडकीपाशीच उभा होता. मग तो वळला — आणि समर्थांना जाणवलं, त्याच्या मनात दहा वर्षं साठलेले प्रश्न आज बाहेर पडणार आहेत.

"गुरुजी, पहिला प्रश्न. दहा वर्षांपूर्वी तुम्ही भाऊसाहेबांना कटू सत्य सांगितलंत — 'ती सुखात नाही, आणि आणखी दहा वर्षं सोसणार आहे.' मला तेव्हाही वाटलं होतं आणि आजही वाटतं — हे क्रूर नव्हतं का? त्यांना अंधारात ठेवलं असतंत, 'ती मजेत आहे' म्हटलं असतंत, तर ते दहा वर्षं तरी निवांत जगले असते. जळत ठेवण्यापेक्षा अंधारात ठेवणं दयाळू नव्हतं का?"

समर्थांनी काठी बाजूला टेकवली.

"निखिल, तू 'जळत ठेवलं' म्हणतोस — मी 'जागं ठेवलं' म्हणतो. फरक समजावतो. रात्री-अपरात्री स्टेशनवर बसलेले दोन प्रवासी बघितले आहेस? एकाला ठाऊक आहे — गाडी पहाटे चारला येणार आहे. दुसऱ्याला काहीच ठाऊक नाही — गाडी येणार की नाही, आली तर कधी, कुणास ठाऊक. आता सांग — रात्र कुणाची जड जाते? वेळ ठाऊक असलेला माणूस डुलकीसुद्धा घेतो, कारण त्याच्या वाट पाहण्याला तळ आहे. वेळ ठाऊक नसलेला माणूस प्रत्येक चाहुलीला दचकतो, प्रत्येक शिट्टीला उठतो, आणि पहाटेपर्यंत आतून पोखरला जातो. भाऊसाहेबांना मी खोटं 'ती मजेत आहे' सांगितलं असतं, तर ते दहा वर्षं निवांत नसते जगले — ते रोज त्या खोट्याला टिचक्या मारून बघत राहिले असते, कारण बापाचं काळीज खोट्या उत्तराने कधीच भरत नाही. मी त्यांना वेदना दिली, हे खरं — पण तळ असलेली वेदना. आणि तळ असलेली वेदना माणसाला बुडवत नाही, निखिल — ती त्याला पोहायला शिकवते."

निखिलने मान डोलावली. मग त्याचा दुसरा प्रश्न आला — जो त्याला सगळ्यात जास्त टोचत होता.

"दुसरा प्रश्न, गुरुजी. आणि तो विचारताना माझा जीव जड होतोय. भाऊसाहेबांची कहाणी ऐकताना मला सगळ्यात जास्त झोंबलं ते चौकीचं पान. ज्या मित्राला ते वीस वर्षं विहिरीतून वर ओढत होते, त्यानेच त्यांच्यावर कागद केला — आणि तोही अशा वजनाने, की एक निरपराध मास्तर पुन्हा मुलीच्या दारापर्यंत फिरकू शकला नाही. गुरुजी, हे ऐकून माणसाच्या मनात कायद्याबद्दल, माणसांबद्दल कडवटपणा येऊ शकतो. तुम्ही याच्याकडे कसं बघता?"

समर्थ बराच वेळ गप्प राहिले. मग ते सावकाश बोलू लागले — आणि त्यांचा आवाज नेहमीपेक्षा गंभीर होता.

"निखिल, भाऊसाहेबांनीच याचं उत्तर त्या दिवशी देऊन ठेवलंय — आपण फक्त ते नीट उलगडू. त्यांनी काय म्हटलं होतं, आठव — 'दोष ढालीचा नसतो; दोष ढाल कशावर उगारायची हे विसरलेल्या हाताचा असतो.' आता याचा अर्थ ऐक. वैद्याच्या कपाटातलं औषध बघितलंयस? तेच औषध, योग्य माणसाला, योग्य मात्रेत दिलं — तर जीव वाचवतं. आणि तेच औषध भलत्या हातात पडून भलतीकडे वापरलं — तर घात करतं. मग चूक औषधाची? की ते बनवणाऱ्या वैद्याची? नाही ना. कायद्याचं तसंच आहे. ज्यांच्या पिढ्यान्‌पिढ्या दारं बंद राहिली, त्यांच्यासाठी काही दारं कायद्याने उघडली — ती उघडायलाच हवी होती, आणि ती ढाल ज्यांना हवी त्यांच्यासाठी सदैव राहायलाच हवी. भाऊसाहेबांसारखा माणूस — ज्याने चाळीस वर्षं सगळ्या जातींची पोरं मांडीवर घेतली — तो चौकीतून बाहेर पडतानाही हेच म्हणाला, हे बघ. त्यांच्या जखमेने त्यांची दृष्टी बिघडवली नाही. आणि म्हणून ते मोठे. जखम झाली की माणसं अख्ख्या जगाला दोष देतात — कायद्याला, जातीला, समाजाला. भाऊसाहेबांनी दोषाचा पत्ता अचूक शोधला — एक हात. एक माणूस. ज्याने अनेक वर्षांच्या मैत्रीचं आणि एका चांगल्या कायद्याचं — दोन्हींचं — एकाच दिवशी वजन गैर वापरलं. निखिल, कडवटपणाला नेमका पत्ता नसला की तो पसरत जातो — अख्ख्या समाजावर, अख्ख्या व्यवस्थेवर. आणि नेमका पत्ता सापडला की तो आटोक्यात राहतो — एका माणसापुरता. शहाणपण म्हणजे दुसरं काही नाही — जखमेला नेमका पत्ता देता येणं."

निखिल बराच वेळ गप्प राहिला. बाहेर श्रावणाचं कोवळं ऊन अंगणात उतरलं होतं. मग त्याचा तिसरा, शेवटचा प्रश्न आला — आवाज खाली आणून, जणू स्वतःलाच विचारावा तसा.

"शेवटचा प्रश्न, गुरुजी. आणि तो ज्योतिषाचा नाही — माणसाचा आहे. पोटची पोरगी बापावर चौकीत कागद करते — आणि बाप दहा वर्षं तिची खोली जशीच्या तशी ठेवतो, तिच्या नावाने सेवा करतो, आणि फोन येताच 'पत्ता सांग' म्हणतो. मला हे ऐकताना घसा दाटून आला — पण एक प्रश्नही आला. हे प्रेम म्हणायचं की दुबळेपण? स्वाभिमान नावाची चीज असते ना माणसाला? एवढा अपमान गिळून वाट पाहत राहणं — हे मोठेपण, की स्वतःला विसरणं?"

समर्थ उत्तरले नाहीत — आधी ते हसले. एक खोल, मायाळू हसू.

"निखिल, दुबळेपण आणि वाट पाहणं यात एक साधी परीक्षा आहे — दुबळा माणूस वाट पाहत नाही, तो लोंबकळतो. त्याला पर्याय नसतो, म्हणून तो सहन करतो. भाऊसाहेबांकडे पर्याय होते — ते रागावू शकले असते, तिचं नाव टाकू शकले असते, 'जिने बापाला आरोपी केलं ती मुलगी मेली मला' म्हणून मोकळे होऊ शकले असते; जग असंच करतं, आणि जग त्याला 'स्वाभिमान' म्हणतं. त्यांनी यातलं काहीच केलं नाही — निवडून केलं नाही. वाट पाहणं ही त्यांची अगतिकता नव्हती, निखिल — ती त्यांची रोज पहाटे नव्याने केलेली निवड होती. आणि जे रोज निवडावं लागतं, ते दुबळेपण नसतं — ती तपश्चर्या असते. दुसरं — स्वाभिमान म्हणतोस? स्वाभिमानाचं काम माणसाची किंमत राखणं. पण ज्या क्षणी स्वाभिमान माणसापेक्षा किंमतीलाच जपायला लागतो, त्या क्षणी त्याचं नाव बदलतं — तो अहंकार होतो. सरिताकडे बघ — तिनेही 'स्वाभिमान'च जपला होता ना? 'मी परत जाणार नाही, मी माघार घेणार नाही, मी सिद्ध करीन' — दहा वर्षं. त्या स्वाभिमानाने तिला काय दिलं? आणि भाऊसाहेबांनी स्वाभिमान बाजूला ठेवला — त्याने त्यांना काय दिलं? हिशेब मांड. बाप-लेकीच्या नात्यात, निखिल, जो आधी वाकतो तो हरत नाही — तो दोघांना वाचवतो. भाऊसाहेब दहा वर्षं वाकून उभे होते — आणि म्हणून काल एक तुटलेलं घर पुन्हा जोडलं गेलं. चौकीतल्या कागदावरची सही आणि फोनवरचे 'पत्ता सांग' हे दोन शब्द — या दोन्हींत जास्त ताकद कशात होती, हे आता तूच ठरव."

निखिलने हात जोडले. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं — आणि यावेळी त्याने ते लपवलं नाही.

"गुरुजी, आज मला शनीची महादशा कळली, दशांचा क्रम कळला — पण त्याहून मोठं हे कळलं की काही माणसांचं प्रेम शब्दांत राहत नाही, ते कृतीत राहतं. न हलवलेल्या खोलीत, न चुकवलेल्या शनिवारात, आणि न विचारलेल्या जाबात. आणि असं प्रेम डोळ्यांत कधी दिसत नाही — कारण ते डोळ्यांत मावतच नाही."

समर्थ उठले. अंगणात श्रावणाचं ऊन-पावसाचं खेळ चालू होतं — क्षणात सर, क्षणात ऊन.

"चल निखिल. आणि एक लक्षात ठेव — आपल्याकडे लोक पत्रिका घेऊन येतात, प्रश्न घेऊन येतात, दुःख घेऊन येतात. पण अधूनमधून एखादा भाऊसाहेब येतो — जो आपल्याला शिकवून जातो. आभाळ आपल्या हातात नसतं, हे ज्योतिष सांगतं. कायद्याने आखलेल्या रेषाही आपल्या हातात नसतात, हे जग सांगतं. पण बांध आपल्या हातात असतो — हे भाऊसाहेबांसारखी माणसं सांगतात. आणि खरं जगणं या सगळ्यांच्या मधे असतं."

त्या जुन्या वाड्याच्या भिंतीवर, इतर अनेक कहाण्यांच्या शेजारी, आता आणखी एका कहाणीचा ठसा उमटला होता — एका बापाचा, ज्याच्या हातात कायद्याने बेड्या नव्हे, पण रेषा घातल्या होत्या; ज्याने त्या रेषेबाहेर उभं राहून दहा वैशाख न चुकता बांध लिंपला; आणि दहाव्या श्रावणात, थेंबही वाया न घालवता, आपली परतलेली नदी काठोकाठ धरून ठेवली.


टीप : - सदर कथा हि ज्योतिष वास्तुशात्र सल्लागार डॉ. अभय अगस्ते यांच्या “काळाचे संकेत” या कथा संग्रहातील आहे, ***कथा आवडल्यास वेगवेळ्या ग्रुप मध्ये किंवा आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना लेखकाच्या नावासह जरूर शेअर करा**  या कथेतील सर्व पात्र हे काल्पनिक आहेत, काही साम्य आढळ्यास तो निव्वळ योगायोग समजावा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धन स्थिरता वाढवण्यासाठी सोपे आणि प्रभावी ज्योतिष उपाय! | अभय अगस्ते, नाशिक

घरात लक्ष्मी स्थिर कशी ठेवावी? | वास्तू उपाय जे देतील आर्थिक स्थिरता आणि समृद्धी