शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

ज्योतिष आणि कर्मफळ

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥

अर्थ: तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको; (पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको.
भगवतगीतेच्या दुसर्‍या अध्यायातील हा श्लोक आहे. भगवंतानेही स्पष्टपणे कर्म करण्यास सांगितलं आहे. जोपर्यंत आपण कर्म करणार नाहीत तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही.
                   ज्योतिषशास्त्र हे आपल्याला योग्य कर्म करण्याची दिशा दाखवणारं शास्त्र आहे. सामान्य माणसाला वाटतं की आकाशातील ग्रह-तारे आपलं भविष्य कसं ठरवू शकतात? पण आकाशातील ग्रह-तारे हे आपल्याला वर्तमानात कोणता मार्ग अवलंबला पाहिजे यासाठीचा प्रकाशमार्ग दाखवत असतात. ज्या काळात आजच्या भौतिकशास्त्राचा किंबहुना दुर्भिणीचाही शोध लागला नव्हता त्याकाळात आपल्या ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्र विकसित केलं आहे. त्याअनुसार भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेता येतो आणि वर्तमानात काय निर्णय घ्यावेत हे समजून येतं. ज्याप्रमाणे हवामान विभाग सांगतो की मोठा पाऊस अथवा वादळ येणार आहे आणि नागरिकांनी घराबाहेर पडू नये त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात कुंडलीचा (पत्रिका) अभ्यास करून त्या व्यक्तीसाठी अनुकूल-प्रतिकूल काळ, स्थळ, क्षेत्र इत्यादीचा अंदाज वर्तवत असतं. जर एखाद्याच्या कुंडलीचा अभ्यास करत असताना असं दिसून आलं की त्या मुलाला/मुलीला शिक्षणात फार गती नाही पण व्यवसाय करण्यास उपयोगी पडणारे सर्व गुण आहेत तर त्या व्यक्तिला प्रथमपासून व्यवसाय क्षेत्रात काम करण्याची मानसिकता तयार करता येते. याचा अर्थ इतकाच की त्या मुलाला/मुलीला कर्म करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी योग्य दिशा समजून आली.
ज्योतिष जाणून घेणं अशासाठी महत्वाचं आहे की, आपण आपलं काम करत असताना, जीवतोड मेहनत करत असताना त्यातून अपेक्षित यश मिळत नसेल तर आपली सगळी मेहनत चुकीच्या दिशेने होत आहे हे समजून येईल. वार्‍याच्या विरुद्ध दिशेने नाव चालवणे जितके कठीण तितकंच कठीण असतं चुकीच्या दिशेने केलेली मेहनत. आजचा काळ हा Smart Work चा आहे. त्यामुळे कमीत कमी कष्ट घेऊन अपेक्षित साध्य साधता येणे शक्य असेल तर तो मार्ग अवलंबला पाहिजे. ज्योतिषशास्त्र त्यात मदत करेल. आपण कोणतं शिक्षण घ्यावं, कोणता व्यवसाय करावा, कोणत्या क्षेत्रात नोकरी करावी, विवाहयोग कधीजुळून येईल ते आरोग्यविषयक काय काळजी घ्यावी या सर्वामध्ये जर ज्योतिषशास्त्राची मदत घेतली तर आयुष्यात अभूतपूर्व बदल होताना दिसून आले आहेत.
ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आपण अनेक बाबींची स्पष्टता मिळवू शकतो. बर्‍याचदा आपण ऐकतो की एखाद्याच्या कुंडलीत राजयोग आहे, परदेशवारीचा योग आहे,धनलाभ संभव आहे,संततीसुख नाही, वाहनसुख नाही,विवाहयोग नाही वगैरे वगैरे. अशा प्रकारचं भविष्य आपण वृत्तपत्रातील राशिभविष्यात किंवा टीव्हीवरील कार्यक्रमात पाहतो. आपल्या राशीत चांगले योग असले तर आनंदाने हुरळून जातो आणि कठीण काळ वर्तविला असेल तर घाबरून जातो. पण एकच रास असणार्‍या दोन व्यक्तींचं आयुष्य काही सारखं असत नाही. कारण प्रत्येकाची कुंडली वेगळं सांगत असते आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं असतं. ज्योतिषशास्त्र हे इतकं उथळ नसून त्यात अतिशय लहानसहान बाबींचा अभ्यास केला आहे. जन्म आपल्या हातात नसतो त्यामुळे कुंडली आपण बदलू शकत नाही. पण कर्म आपल्या हातात असतं. अनुकूल-प्रतिकूल बाबींचा तक्ता मांडून आपण उचित निर्णय घेत गेलो तर कर्माच्या तराजूत आपलं पारडं जड असेल आणि त्याचं अपेक्षित फळही मिळेल.
ज्योतिष हे श्रद्धा किंवा अंधश्रद्धा याचा भाग नसून पूर्णतः शास्त्र असल्याने त्यातून अपेक्षित परिणाम दिसून येणं ही सैद्धांतिक मांडणी आहे. त्याचा यथोचित व गुणात्मक वापर अनेकदा सिद्ध झाला आहे. त्यासाठी अतर्क्य गोष्टी करायची आवश्यकता नसते. योग्य तज्ञाचा सल्ला घेऊन ज्योतिषशास्त्राचा उपयोग आपल्याला आयुष्य सोपं, सुलभ व आनंदी करता येतं. नशिबाला दोषी ठरवण्यापेक्षा योग्य कर्मावर आपला विश्वास असायला हवा. 

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

वास्तु: भाड्याचे घर व गृहप्रवेश


एखाद्या वास्तुमध्ये दोष असतो म्हणजे काय? याबद्दल आपण आधीच्या ब्लॉगमधून काही अंशी जाणून घेतलं आहे. पण वास्तुदोषाचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याची तीव्रता आज आपण समजून घेणार आहोत.
वास्तुशास्त्राबद्दल बोलत असताना आपण दहा दिशा, गुरुत्वाकर्षण, वैश्विक ऊर्जा अशा अनेक घटकांचा विचार करत असतो. यातील प्रत्येक दिशेशी एक तत्व निगडीत आहे. प्रत्येक ऊर्जेचा मानवी शरीर व मनावर थेट परिणाम असतो. जर यामध्ये असंतुलन निर्माण झालं तर त्याचे विपरीत परिणाम वास्तुमध्ये राहणार्‍या मानवांवर होत असतात.
कुटुंबाला सुख लाभतच नाही, कुठल्याच क्षेत्रात यश येत नाही,घरातील तरुण पिढी वाईट मार्गावर जात असणे,सतत आर्थिक नुकसान होत राहणे,हितशत्रूंपासूनत्रास होणे अशा समस्या ज्या सर्वसामान्य कुटुंबात सहजासहजी दिसून येत नाहीत त्या वास्तुदोष असलेल्या कुटुंबात दिसून येतात. आधी सांगितल्याप्रमाणे,आग्नेय ही अग्नि तत्वाची दिशा आहे, ईशान्य जल तत्वाची आहे तसं सर्वच दिशेला पंचमहाभूतांतील एका तत्वाशी बांधलं गेलं आहे. त्या दिशेत जर गंभीर दोष असतील तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतात. खासकरून घरातील सदस्यांचं मानसिक व शारीरिक आरोग्य ढासाळू शकतं.
आपल्यातील अनेकांनी एक अनुभव नक्की घेतला असेल की, एखाद्या नवीन वास्तूत राहायला गेल्यावर सुरुवातीला थोडं अस्वस्थ वाटत असतं. ज्या लोकांचं स्वतःचं घर नाही व त्या कारणाने सतत नवीन घरात राहायला जावं लागतं अशांनी हा अनुभव नक्की घेतला असेल.नोकरी अथवा इतर निमित्ताने ज्यांना सतत घर बदलायची वेळ येते त्यांना असे अनुभव नवे नाहीत.ज्या वास्तूत आपण राहायला जातो त्या वास्तूचे आपल्यावर परिणाम होत असतात हेच यातून स्पष्ट होतं. कधी कधी एखाद्या घरात राहायला गेल्यावर भरभराट होऊ लागते तर कधी एखादं घर अधोगतीस कारणीभूत ठरतं. यापुढे जाऊन सांगायचं तर काही वास्तु या अशुभ अथवा अरिष्ट आहेत अशा चर्चा आपण ऐकत असतो. एखादा जुना वाडा असो किंवा भौतिकदृष्ट्या चांगलं घर असो, ते लाभत नाही असं म्हणतात. त्या वास्तूत राहणार्‍यांना चित्रविचित्र भास होत असतात, शांत झोप लागत नाही, वाईट स्वप्नं पडत असतात, सतत असुरक्षिततेची जाणीव होत असते वगैरे वगैरे. अशा घटना आपण ऐकतो, वाचतोपण त्याची कारणीमीमांसा करू शकत नाहीत. शिवाय, त्यात काही तथ्य आहे की नाही याबद्दल आपल्याला खात्री नसते. पण वास्तूच्या बांधणीमध्ये खूप मोठे दोष असतील तर ती वास्तु नकारात्मक उर्जेचं केंद्र बनून जाते. काही वास्तूच्या आसपास किंवा ज्या जागेवर वास्तु उभी आहे तेथे नकारात्मक शक्तींचा उगम असू शकतो. जसं मंदिरात प्रसन्नता लाभते तसं काही ठिकाणी अस्वस्थता जाणवू शकते. जर एखाद्या ठिकाणी वाईट उर्जांचा प्रवाह तीव्र असेल तर तेथे मानवी स्वास्थ्य बिघडणे स्वाभाविकच आहे. वास्तुमधील दोषांमुळे इतके गंभीर प्रकार होऊ शकतात आणि महत्वाची बाब म्हणजे ते दोष निवारण करता येतात. जर नवीन जागेत राहायला जाणार असाल तर ती जोखून घ्यावी आणि वास्तूत राहायला जाण्यापूर्वी त्याचे गृहशांतही करून घ्यावी असे संकेत आहेत. वास्तूत राहायला जाण्यापूर्वी वास्तुशास्त्रतज्ञाचा सल्ला घ्यावा. यामागे हेतु एकच की ज्यावेळी एखादं कुटुंब त्या वास्तूत राहायला जातं तेंव्हा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ नयेत.
ज्यावेळी स्त्री लग्न करून गृहप्रवेश करते तो क्षण त्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचा व Turning Point असतो. कारण घरात नव्याने राहायला आलेली स्त्री त्या कुटुंबासाठी गृहलक्ष्मी चं रूप असते. जर वास्तूचा त्या स्त्रीवर सकारात्मक परिणाम होत असेल तर कुटुंबात आनंद व समाधान नांदू लागतं अन्यथा कुटुंबात विभक्तपणाही येऊ शकतो. त्या स्त्री चं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी राहणं महत्वाचं असतं. स्त्रियांचा स्वभाव लग्नानंतर बदलतो असं म्हणतात त्यामागेही कुठेतरी वास्तूतील झालेला बदल हे एक कारण असू शकतं. त्यामुळेच लग्न झाल्यानंतर सत्यनारायन, वास्तुशांत, गृहशांती करण्याचे संकेत आहेत.
जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर वास्तु इतकी महत्वाची ठरणार असेल तर ती वास्तु निर्दोष असावी. शांत, सुखी आणि प्रगतिच्या वाटेवरील जीवनासाठी निर्दोष व संपन्न वास्तूची निवड करावी!

ज्योतिष आणि गैरसमज


आपण याआधीच्या ब्लॉगमधून ज्योतिष म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली होती. ज्योतिष या शब्दाची फोड ज्योत + भविष्य अशी करता येईल. याचा अर्थ या शास्त्रातून भविष्याचा वेध घेता येतो हे स्पष्ट आहे. पण चित्रपटात दाखवतात तसं ही काही Time Machine नाही की आपण आरपार पाहू शकतो. ज्योतिषशास्त्रात अनेक बाबींचा अभ्यास करून जे निष्कर्ष काढतात तेसंकेत असतात, अंदाज असतात. आयुष्य खूप मोठं आहे. त्यात सर्वांनाच सुखाचा हव्यास आहे. मग या दीर्घ आयुष्यात सुखाकडे वाटचाल करायची असेल तर योग्य मार्गदर्शन असायलाच हवं. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे, कोणते धोके असू शकतात, काय संधी असू शकतात, कोणत्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे, कुठे ठेच लागू शकते आणि कुठे जरासा विसावा घेतला पाहिजे हे सर्व ज्योतिषशास्त्राच्या आधारे जाणून घेता येतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या अभ्यासाअंती असा निष्कर्ष निघू शकतो की येणार्‍या काळात ग्रहमान प्रतिकूल असून पोट, हृदय संबंधित विकार उद्भवू शकतात तर साहजिकच ती व्यक्ति काळजी घेऊन ते टाळू शकते. किंवा जर ग्रहमान अनुकूल असेल आणि पत्रिकेत धनलाभ योग दिसून येत असेल तर ती व्यक्ति व्यवसायात धाडस करू शकते किंवा शेअर मार्केट व इतर क्षेत्रात प्रयत्न करून आर्थिक लाभाच्या संधी हस्तगत करू शकते.
          ज्योतिषशास्त्र हे वैज्ञानिक कसोटीवरही खरं ठरत असताना आणि जगभरात त्याचा अभ्यास केला जात असताना त्याबद्दल अनेक गैरसमज सुद्धा रूढ होत गेले आहेत. लग्न पत्रिकेत मंगळ ग्रह असणे, शनीची साडेसाती,राहूचं भ्रमण अशा बाबतीत ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन वाट्टेल ते उपाय केले जातात. शिवाय, अचानक धनलाभ व्हावा म्हणून तर्‍हेतर्‍हेचे प्रताप केले जातात. आजकालच्या तरुणांमध्ये हव्या त्या व्यक्तिचं प्रेम मिळविण्यासाठीही ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन चित्रविचित्र उद्योग केले जातात. समाजातील अडचणींने ग्रासलेल्या सामान्य मानवांचा गैरफायदा घेणारे लोकही आहेतच. केवळ अशा काही प्रकारांमुळे ज्योतिषशास्त्र, कुंडली याबद्दल समाजात गैरसमज पसरताना दिसून येतात. शेवटी कर्म केल्याशिवाय फलप्राप्तीची अपेक्षा करणे चुकच आहे. ग्रहमान अनुकूल असूनही जर एखादा व्यक्ति प्रयत्न करत नसेल तर त्यातून फळाची अपेक्षा करणे गैरच आहे. आपल्याकडे प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते योग्यच आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे, ज्योतिषचा अर्थ ज्योति+भविष्य असा आहे म्हणजे जिथे ज्योति आहे तिथे प्रकाश आहे; हे प्रकाशमय भविष्याकडे घेऊन जाणारं शास्त्र आहे. तेथे अंधाराकडे घेऊन जाणार्‍या अंधश्रद्धेला थारा नाही. त्यामुळे सर्वांनी सजग राहून योग्य तो पर्याय निवडणे आवश्यक आहे.
ज्योतिषशास्त्राचा अवलंब करून आयुष्यातील अनेक जटिल समस्यांवर मात करता येते. अशक्यही शक्य करता येतं, पण त्यासाठी कृतीशील असणं आवश्यक आहे. आपल्यातील अवगुणांचं ओझं सोडून नवीन दृष्टीकोणातून प्रारंभ करावा लागतो. विधिलिखित बदलता येत नसलं तरी सावध राहून त्यातून मार्ग शोधता येतात. जसं वैद्यकशास्त्र,संगणकशास्त्र हे मानवी हिताचे आहेत तसंच ज्योतिषशास्त्रही.
ज्योतिषशास्त्र शिक्षण, आरोग्य,करियर,धनलाभ,वास्तुसुख, संततीसुख,कौटुंबिक सुख,परदेशवारी, प्रसिद्धी अशा मानवी आयुष्यातील प्रत्येक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण परीक्षण करून योग्य मार्गदर्शन करू शकते. त्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्रातील तज्ञ व्यक्तीकडे जाऊन कसलाही संकोच न करता त्यांना सर्व माहिती दिली पाहिजे जेणेकरून आपल्या आयुष्यात अपेक्षित सुख साधता येईल.


रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

वास्तुशास्त्र: धन आणि आरोग्य : भाग २

आर्थिक सुख मिळाल्यानंतर आरोग्यचं सुखही अतिशय आवश्यक आहे. आपल्याकडे पैसा कितीही असूद्या पण
जर त्याचा उपभोग घेण्यासाठी उत्तम आरोग्य नसेल तर सर्वकाही निष्फळ आहे. जीवन हसत हसत जगून समाधानाने
मृत्यू येणे हीच सुखी आयुष्याची व्याख्या आहे. यामध्ये संपन्न व दोषमुक्त वास्तु सर्वात महत्वाची भूमिका निभावते
असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. वास्तूचा सर्वाधिक परिणाम होत असेल तर तो म्हणजे त्या वास्तूत सतत निवास
करणार्‍या मानवी शरीर व मनावर. विविध दिशेने येणार्‍या सकारात्मक-नकारात्मक वैश्विक ऊर्जा, गुरुत्वाकर्षण
हे वास्तूत राहणार्‍या शरीर-मनावर परिणाम करतात आणि त्यातूनच शारीरिक व मानसिक आरोग्याची
जडणघडण होत असते. 
काही घरांमध्ये सतत आरोग्याच्या तक्रारी सुरू असतात. एक झालं की दुसरं दुखणं सुरूच असतं. दुर्दैवाने
अकाली मृत्यूही होतात. घरात सतत वाद-विवाद होत असतात. मानसिक अस्वास्थ्य जाणवत असतं. असं
होऊनही माणसं वर्षानुवर्षे ते निमूटपणे सहन करतात. पण त्यावर सोपे उपाय अवलंबून आहेत. त्यात खूप खर्च
करणे अथवा जागेची तोडफोड करणे अशी आवश्यकता नाही. आपल्या वास्तूत छोटे-मोठे बदल करून आणि
काही सुचनांचं अवलंबण केलं तर या सर्व जाचातून सुटका मिळू शकते.  
आपण आरोग्य आणि वास्तूच्या बांधणीत काय संबंध असू शकतो याची उदाहरणे पाहुयात. जसं घराच्या ईशान्य
कोपर्‍यात बेडरूम असेल तर ती विविध रोगांना आमंत्रण देणारी ठरते. खासकरून घरातील कर्ता पुरुष जर
त्या खोलीत झोपत असेल तर केवळ आरोग्यच नाही तर त्याच्या कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतात.
नैऋत्य दिशेला जर काही अडगळ ठेवली तर पृथ्वी तत्व स्थिर राहतं, आग्नेय कोपर्‍यात स्वयंपाकघर असेल तर
त्यात अग्नि तत्व स्थिर राहतं. अशी प्रत्येक दिशेची तत्व आहेत ज्यानुसार घराची रचना केली तर निर्दोष वास्तु
आपल्याला सुख-समाधान देण्यात सफल होत असते. पण केवळ असे वरवर उपाय केले म्हणजे आपल्या
समस्या सुटून लागलीच त्यातून फलप्राप्ती होईलच असं नाही. आपल्या घराची एकंदरीत बांधणी, आजूबाजूला
असलेला परिसर, खिडक्या-दरवाजे कोणत्या दिशेला आहेत हे सर्व तपासून पाहावं लागतं. नेमका दोष कोठे
आहे आणि त्याचा घरातील कुटुंबावर काय परिणाम होत आहे हेसुद्धा तपासावे लागते. घरात एखाद्या सदस्याला
सतत वात, पित्त, डोकेदुखी असे काहीना काही त्रास होत असतील तर पूर्वकडील आणि दक्षिणेकडील
रूममध्ये दोष असू शकतो. दक्षिण दिशेला टीव्ही असेल तर टीव्ही बघत जेवण करण्याची सवय असणार्‍यांना
त्रास उद्भवू शकतात. घरात काही आनुवंशिक आजार असतील तर संतुलित वास्तूच्या सहाय्याने त्यांचीही तीव्रता
कमी करता येते. आरोग्यासंबंधित असे अनेक संकेत, सूचना वास्तुशास्त्रात केले आहेत. आरोग्य आणि वास्तु
यांचा थेट संबध आहे असं वास्तुशास्त्र सांगतं. आपली वास्तु शक्य तेवढी दोषमुक्त असावी जेणेकरून निरोगी
आयुष्याचा उपभोग घेता येईल!
आरोग्य व आर्थिक सक्षमतेसाठी काही गोष्टी आवर्जून पाळाव्यात अशा असतात. उदाहरणार्थ, घरात तुटके-फुटके आरसे असू नयेत, कोपर्‍यात भंगारवस्तु जमा केलेल्या असू नयेत, वास्तूशांतीचे नारळ, निर्माल्य हे जमा करून ठेवलेले असू नये, घरच्या मुख्य दरवाजाला उंबरा असणं आणि वेळोवेळी तो साफ करणं आवश्यक आहे. काय करू नये हे जसं महत्वाचं आहे तसं काय करावे जेणेकरून वास्तु संतुलित व लाभदायी राहील हेही महत्वाचं आहे. त्यामध्ये टिप्स बर्‍याच देता येतील. उदाहरणार्थ, घरात लक्ष्मीयंत्र असणे, कुबेरमंत्र उच्चारणे, घरात बांबू ट्री ठेवणे, उत्तर दिशेला असलेली खिडकी उघडी ठेवणे, आग्नेय कोपर्‍यात वास्तुपुरुषाची स्थापना अशा अनेक बाबी आहेत ज्यांचा अवलंब आपल्याला आर्थिक संपन्नता व आरोग्यदायी जीवन देऊ शकतं. पण या बाबी मनाने करण्यापेक्षा तुम्ही सुविद्य वास्तुशास्त्रतज्ञकडून जाणून घ्याव्यात आणि त्याची अमलबजावणी करावी. शेवटी आपल्या वास्तूत नेमका दोष कोठे आहे हे जाणून घेण्यासाठी वास्तुचं परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यानंतरच समस्येचं मूळ स्पष्टपणे समजू शकतं. दोषमुक्त वास्तु हीच सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असं म्हणता येईल.

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

वास्तुशास्त्र: धन आणि आरोग्य: भाग १


वास्तुशास्त्र म्हणजे काय याची माहिती आपण यापूर्वीच्या ब्लॉगमधून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी सामान्य माणूस संपन्न वास्तूचा अट्टहास धरत असतो. ज्यावेळी त्याला अडचणी येतात किंवा सर्व सुरळीत सुरू असताना काही अशुभ होऊ नये या चिंतेने तो वास्तुशास्त्र या विषयाकडे वळतो. आरोग्य,धन, शिक्षण,प्रतिष्ठा,करियर, विवाह असे अनेक विषय आपण वास्तुच्या अनुषंगाने अभ्यास करू शकतो. जर त्यासंबंधी काही समस्या असतील तर त्यावर उपायही करू शकतो.

आपली वास्तु सुख देणारी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. आणि सुखाची व्याख्या ही आर्थिक व आरोग्याच्या सुखाच्या जवळ येऊन थांबते. आपल्याकडे धनसंपत्ती असावी आणि उत्तम आरोग्य असावं जेणेकरून आपण सुखी होऊ शकतो असं सर्वांनाच वाटत असतं. त्यामुळे आपण धन आणि आरोग्य यांचा वास्तूशी संबंध काय असतो, शिवाय धन व आरोग्य प्राप्तीसाठी वास्तु कशी असावी, त्यात छोटे-मोठे काय बदल करावेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आधी आपण धन या विषयावर जाणून घेऊ!
आर्थिक सुबत्ता ही आजच्या काळातील गरज आहे. वाढणारी महागाई, शहरी जीवनशैली, समाजातील असुरक्षितता अशा अनेक गोष्टी आहेत जेणेकरून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. शिवाय, आजच्या युगात आपल्या आर्थिक संपन्नतेवर समाजात प्रतिष्ठा लाभत असल्याने प्रत्येकजण पैसे कमविण्यासाठी धडपडत असतो. पैसे येण्याचा एकच स्रोत असू नये, विविध बाजूंनी पैसा यावा यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. हे काळाशी सुसंगत आहे. या बहुतांश लोकांची दुसरी अडचण अशी असते की पैसा येतो मात्र तो टिकत नाही. घरात पैसा न टिकणे हे फार अशुभ वं धोकादायक आहे. कारण याचा अर्थ असा की लक्ष्मीमाता आपल्याकडे राहू इच्छित नाही. ती आपल्याकडे येत आहे पण आपल्या चुकीच्या व्यवहारामुळे आपल्यावर नाखुश होऊन ती आपल्याजवळ रहात नाही. या विषयावर वास्तुशास्त्रात सखोल अभ्यास केला आहे. नोकरीतून येणारा पैसा हा स्थिर असतो. म्हणजे महिन्याला अमुक-अमुक रक्कम तुमच्याकडे येत असते. येथे विषय असतो तो ती रक्कम टिकवणे आणि त्याची वृद्धी होणे. जर नोकरी बदलून चांगल्या पगाराची नोकरी मिळणे अपेक्षित असेल तर तो विषय फक्त पैशांचा नसतो तर तुमच्या बुद्धीचा, आवडीचा असतो. व्यापरातून येणारा पैसा हा स्थिर नसतो. तो कधी कमी तर कधी जास्त होत असतो. येथे पैसा येणे निश्चित नसल्याने लक्ष्मी मातेला प्रसन्न करणे आवश्यक आहे. आपण अनेकदा बघतो की एखादा व्यापारी त्याच्या धंद्यात अचानक पैसे कमवू लागतो आणि बघता बघता करोडपती होतो. ही किमया असते.
वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, घराचा मुख्य दरवाजा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा असे संकेत आहेत. सूर्याच्या उगवण्याची दिशा पूर्व असल्याने सूर्याची सकारात्मक ऊर्जा घरात येते असं त्यामागील कारण आहे. पण जर समजा आपलं घर त्यापद्धतीने बांधलेलं नसेल तर लागलीच त्यात तोडफोड करण्याची गरज नाही. वास्तुशास्त्रतज्ञाची मदत घेऊन विनातोडफोडही यावर उपाय करता येतो. त्यासाठी आपल्या घराचं परीक्षण करणे आवश्यक आहे. यासोबतच आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पितळ धातुपासून बनवलेलं “ओम” चिन्हं लावलं तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही.आग्नेय दिशा ही धनप्राप्तीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. आग्नेय म्हणजे अग्निची दिशा! आणि अग्नि म्हणजे ऊर्जा. त्यामुळे त्या दिशेचा कार्य आणि त्यातून येणारं धन याच्याशी थेट संबंध आहे. त्यामुळे आग्नेय दिशेला काही दोष असतील तर घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. घरात पैसा न येणे हा त्यामध्ये महत्वाचा दोष मानला जातो. आग्नेय दिशेसोबतच उत्तर ही पैशांची दिशा मानली जाते. त्या दिशेला जर काही जड वस्तु असतील तर त्या वास्तुतही दोष आहे असं म्हणता येतील. त्यामुळेच या सर्वांचं योग्य परीक्षण करून वास्तूतील दोष कमी करणे आवश्यक ठरते.घरातील तिजोरी कोणत्या दिशेला ठेवली आहे, देवघर कोणत्या दिशेला आहे अशा बाबींचा अभ्यासही करावा लागतो ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. घरातील व्यक्तींच्या कार्यक्षमतेवरच घरातील लक्ष्मीचं येणं अवलंबून असल्याने या सर्व बाबींचा अभ्यास महत्वाचा ठरतो. शेवटी, आर्थिक सुबत्ता हा प्रत्येक कुटुंबासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. कधी कधी कष्ट करूनही पैसा मिळत नाही आणि त्यातून मग नैराश्य येतं आणि नशिबाला दोष दिला जातो. या सगळ्यातून बाहेर पडणे सहज शक्य आहे. आपल्याला फक्त आपल्या वास्तूतील दोष कमी करावे लागतील आणि स्वतःचे गुण जाणून घ्यावे लागतील.

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

वास्तुशास्त्र: सुखी जीवनाचं सूत्र


प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात असतो. आयुष्यभर हा शोध सुरूच असतो. पण आयुष्यात एकाच वेळेस सर्व सुख मिळत नसल्याने माणूस समाधानाने जगू शकत नाही. आरोग्य, धन-संपत्ती,नातेसंबंध,शिक्षण या सर्व गोष्टी एकाच वेळेस मिळत नाहीत. एक आहे तर दुसरं नाही अशी अवस्था असते. त्यामुळे समाधानाने जगता येत नाही. पण समाजात असे काही व्यक्ति असतात, अशी काही कुटुंबं असतात ज्यांना समाधान लाभतं! त्यांच्या अशा निस्सीम जगण्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. पण जर याचा सखोल विचार केला तर त्यामागे एक परिपूर्ण वास्तु असल्याचं आढळून येईल. समाधानी आयुष्यासाठी निरोगी शरीर, निरोगी मन आणि पूर्ण कार्यशीलतेने काम करणे महत्वाचं आहे. जर आपली वास्तु दोषमुक्त असेल तर आपण सुखी जीवनाच्या मार्गावर असतो असं खात्रीने म्हणता येईल. ज्या ठिकाणी आपण बहुतांश वेळ राहतो, जेवतो, झोपतो, अभ्यास करतो, महत्वाचे निर्णय घेतो ती वास्तु जर आपल्यावर प्रभाव टाकणारी असेल तर ती निर्दोष व परिपूर्ण असलीच पाहिजे.
आपण आधीच्या ब्लॉगमध्ये वास्तुशास्त्र म्हणजे काय हे जाणून घेतलं होतं. माणसाने स्वतःच्या निवार्‍यासाठी एखादी झोपडी जरी बनवली असेल तरी ती वास्तुच असते. कुठल्याहीवास्तूमध्ये वास्तुशस्त्राप्रमाणे बदल करून ती वास्तु दोषमुक्त केली तर आयुष्यातील अनेक समस्यांमधून सुटका मिळू शकते.आपल्या जीवनात आरोग्य, धनसंपत्ती,नातेसंबंध, शिक्षण, करियर हे सुखाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या प्रत्येक मुद्द्यांचावास्तुशास्त्रात विचार केला गेला आहे. अपयश येणे यामागे अनेक कारणे असू शकतात. पण त्यासाठी स्वतःत बदल करणे हाच उपाय आहे. जर स्वतःमध्ये ते बदल घडवायचे असतील आपल्यावर प्रभाव टाकणार्‍या वास्तूतही ते बदल करणे आवश्यक आहे. आपण पूर्ण क्षमतेने काम करावे,आपल्यातील दोष कमी होऊन क्षमतांचा पूर्ण वापर व्हावा असं वाटत असेल तर आपली वास्तु त्यासाठी अनुकूल असावी लागते हेही तितकेच महत्वाचे आहे.
आपण लहानपणापासून घरातील जेष्ठांकडून ऐकत आलो आहोत की दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, उंबर्‍यावर शिंकू नये, घराचा दरवाजा योग्य योग्य दिशेत योग्य पदात असावा वगैरे. या काही कपोलकलिप्त गोष्टी किंवा अंधश्रद्धा नसून त्यामागे शास्त्रीय कारण आहे. यामागे काहीतरी तर्क आहे. वास्तुशास्त्र अशाच तर्कांच्या आधारे वास्तूची रचना कशी असावी याबद्दल सूचना करत असतं. काही घरांमध्ये सतत कोणीतरी आजारी असतं. एक झालं की दुसरं दुखणं सुरू असतं. अशाने मग त्या कुटुंबाची मनोवस्था आणि आर्थिक स्थितिही बिघडत जाते. काही कुटुंबात सतत कलह होत असतात. अगदी छोट्या-छोट्या प्रसंगावरून भांडणं होतात. काही कुटुंबात पैसे येतात पण ते टिकत नाहीत. कुठल्यातरी निमित्ताने पैशांचा क्षय होत असतो. या अशा घटना अनेक कुटुंबात घडत असतात पण त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कोण करत नाही. वास्तुशास्त्रात याचा अभ्यास केला आहे आणि त्यानुसार उपायही निश्चित केले आहेत. अशा घरात वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार कोणते बदल करावेत जेणेकरून सर्व तक्रारींपासून सुटका करून घेता येईल याबद्दल पूर्ण मार्गदर्शन मिळू शकतं. अगदी साधं सांगायचं झालं तर घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर मोठं झाड असू नये जेणेकरून स्वच्छ सूर्यप्रकाश व हवा येण्यापासून त्याला अवरोध व्हावा. पूर्व ही सूर्याची उगवण्याची दिशा आहे. जर सूर्याची प्रकाशमान किरणे घरात येत असतील तर ती घरातील सदस्यांच्या आरोग्याला उपयुक्तच ठरणारी असतात. असे सामान्य व सहज अवलंबता यावेत असे संकेत पाळले तर मोठी हानी होण्यापासून जपून राहता येतं. घरात नेमकी कोणती समस्या आहे त्याचा अभ्यास करून वास्तूमध्ये कोणते बदल करावेत याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. वास्तुतज्ञच यामध्ये योग्य मदत करू शकतात.
                   माणसाचं भवितव्य हे त्याच्या भूतकाळावर नाही तर त्याचं वर्तमान कसं आहे यावर अवलंबून असतं. अशिक्षित पालकांची मुलं आयएएस, आयपीएस होतात. आरोग्याच्या सर्वच तक्रारी काही आनुवांशिक असत नाहीत. तुमची राहणी, तुमच्यावरील संस्कार, संगत आणि तुमची स्वतःची विचारशैली हे तुमचं भवितव्य ठरवत असते. मानसाच्या जडणघडणीत वास्तूचा मोठा सहभाग असतो.
घर बांधत असताना ते ते वास्तुशास्त्राच्या संकेतनुसार बांधलं तर उचित राहील. पण जर घर बांधून झालं आहे आणि आता जर तुम्हाला वास्तुशास्त्राच्या संकेतांचं अनुकरण करायचं असेल तर राहत्या घरात मोठी तोडफोड करायची गरज नाही. जर आहे त्या घरामध्ये काही बदल केले तरी अपेक्षित फळ मिळू शकतं.देवघराची जागा बदलणे,बैठकीच्या खोलीत थोडेसे बदल करणे,पैसे ठेवायच्या जागेत बदल,अडगळीची खोली बदलणे, घड्याळ-कॅलेंडर योग्य ठिकाणी लावणे असे छोटे-मोठे बदल त्याअंतर्गत येतात. अशा पद्धतीचे अनेक छोटे-मोठे बदल करून परिपूर्ण आणि दोषमुक्त वास्तु आपल्याला चिंतामुक्त करेल.
वास्तुशास्त्र हे आजच्या काळात अतिशय उपयुक्त ठरू शकतं. कारण आपल्याकडे फ्लॅट संस्कृती रुजू लागली आहे. एकाच इमारतीत अनेक फ्लॅट असतात. ते आपल्या मनाजोगे असत नाहीत. तयार असतात त्या स्थितीत आपल्याला घ्यावे लागतात. बिल्डर काही वास्तुविशारद नसतो किंवा त्यांचा दृष्टीकोण व्यावसायिक असल्याने त्यांनी वास्तुशास्त्राच्या संकेतानुसार बांधकाम केलेलं नसतं. मग अशा परिस्थितीत जो फ्लॅट आपण घेतलेला असतो त्यात काही बदल करून ती वास्तु परिपूर्ण बनवणे शक्य आहे. एवढी मोठी वास्तु घेत असताना ती परिपूर्ण असावी असा अट्टहास असणे गैर नाही. ती आपल्याला हवी तशी मिळेल याची शाश्वती नसेल पण ती आपल्यावर हवा तसा प्रभाव टाकू शकते याची काळजी मात्र आपण वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने घेऊ शकतो.