शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

वास्तुशास्त्र: धन आणि आरोग्य: भाग १


वास्तुशास्त्र म्हणजे काय याची माहिती आपण यापूर्वीच्या ब्लॉगमधून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी सामान्य माणूस संपन्न वास्तूचा अट्टहास धरत असतो. ज्यावेळी त्याला अडचणी येतात किंवा सर्व सुरळीत सुरू असताना काही अशुभ होऊ नये या चिंतेने तो वास्तुशास्त्र या विषयाकडे वळतो. आरोग्य,धन, शिक्षण,प्रतिष्ठा,करियर, विवाह असे अनेक विषय आपण वास्तुच्या अनुषंगाने अभ्यास करू शकतो. जर त्यासंबंधी काही समस्या असतील तर त्यावर उपायही करू शकतो.

आपली वास्तु सुख देणारी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. आणि सुखाची व्याख्या ही आर्थिक व आरोग्याच्या सुखाच्या जवळ येऊन थांबते. आपल्याकडे धनसंपत्ती असावी आणि उत्तम आरोग्य असावं जेणेकरून आपण सुखी होऊ शकतो असं सर्वांनाच वाटत असतं. त्यामुळे आपण धन आणि आरोग्य यांचा वास्तूशी संबंध काय असतो, शिवाय धन व आरोग्य प्राप्तीसाठी वास्तु कशी असावी, त्यात छोटे-मोठे काय बदल करावेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आधी आपण धन या विषयावर जाणून घेऊ!
आर्थिक सुबत्ता ही आजच्या काळातील गरज आहे. वाढणारी महागाई, शहरी जीवनशैली, समाजातील असुरक्षितता अशा अनेक गोष्टी आहेत जेणेकरून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. शिवाय, आजच्या युगात आपल्या आर्थिक संपन्नतेवर समाजात प्रतिष्ठा लाभत असल्याने प्रत्येकजण पैसे कमविण्यासाठी धडपडत असतो. पैसे येण्याचा एकच स्रोत असू नये, विविध बाजूंनी पैसा यावा यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. हे काळाशी सुसंगत आहे. या बहुतांश लोकांची दुसरी अडचण अशी असते की पैसा येतो मात्र तो टिकत नाही. घरात पैसा न टिकणे हे फार अशुभ वं धोकादायक आहे. कारण याचा अर्थ असा की लक्ष्मीमाता आपल्याकडे राहू इच्छित नाही. ती आपल्याकडे येत आहे पण आपल्या चुकीच्या व्यवहारामुळे आपल्यावर नाखुश होऊन ती आपल्याजवळ रहात नाही. या विषयावर वास्तुशास्त्रात सखोल अभ्यास केला आहे. नोकरीतून येणारा पैसा हा स्थिर असतो. म्हणजे महिन्याला अमुक-अमुक रक्कम तुमच्याकडे येत असते. येथे विषय असतो तो ती रक्कम टिकवणे आणि त्याची वृद्धी होणे. जर नोकरी बदलून चांगल्या पगाराची नोकरी मिळणे अपेक्षित असेल तर तो विषय फक्त पैशांचा नसतो तर तुमच्या बुद्धीचा, आवडीचा असतो. व्यापरातून येणारा पैसा हा स्थिर नसतो. तो कधी कमी तर कधी जास्त होत असतो. येथे पैसा येणे निश्चित नसल्याने लक्ष्मी मातेला प्रसन्न करणे आवश्यक आहे. आपण अनेकदा बघतो की एखादा व्यापारी त्याच्या धंद्यात अचानक पैसे कमवू लागतो आणि बघता बघता करोडपती होतो. ही किमया असते.
वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, घराचा मुख्य दरवाजा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा असे संकेत आहेत. सूर्याच्या उगवण्याची दिशा पूर्व असल्याने सूर्याची सकारात्मक ऊर्जा घरात येते असं त्यामागील कारण आहे. पण जर समजा आपलं घर त्यापद्धतीने बांधलेलं नसेल तर लागलीच त्यात तोडफोड करण्याची गरज नाही. वास्तुशास्त्रतज्ञाची मदत घेऊन विनातोडफोडही यावर उपाय करता येतो. त्यासाठी आपल्या घराचं परीक्षण करणे आवश्यक आहे. यासोबतच आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पितळ धातुपासून बनवलेलं “ओम” चिन्हं लावलं तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही.आग्नेय दिशा ही धनप्राप्तीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. आग्नेय म्हणजे अग्निची दिशा! आणि अग्नि म्हणजे ऊर्जा. त्यामुळे त्या दिशेचा कार्य आणि त्यातून येणारं धन याच्याशी थेट संबंध आहे. त्यामुळे आग्नेय दिशेला काही दोष असतील तर घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. घरात पैसा न येणे हा त्यामध्ये महत्वाचा दोष मानला जातो. आग्नेय दिशेसोबतच उत्तर ही पैशांची दिशा मानली जाते. त्या दिशेला जर काही जड वस्तु असतील तर त्या वास्तुतही दोष आहे असं म्हणता येतील. त्यामुळेच या सर्वांचं योग्य परीक्षण करून वास्तूतील दोष कमी करणे आवश्यक ठरते.घरातील तिजोरी कोणत्या दिशेला ठेवली आहे, देवघर कोणत्या दिशेला आहे अशा बाबींचा अभ्यासही करावा लागतो ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. घरातील व्यक्तींच्या कार्यक्षमतेवरच घरातील लक्ष्मीचं येणं अवलंबून असल्याने या सर्व बाबींचा अभ्यास महत्वाचा ठरतो. शेवटी, आर्थिक सुबत्ता हा प्रत्येक कुटुंबासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. कधी कधी कष्ट करूनही पैसा मिळत नाही आणि त्यातून मग नैराश्य येतं आणि नशिबाला दोष दिला जातो. या सगळ्यातून बाहेर पडणे सहज शक्य आहे. आपल्याला फक्त आपल्या वास्तूतील दोष कमी करावे लागतील आणि स्वतःचे गुण जाणून घ्यावे लागतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा