शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

वास्तु: भाड्याचे घर व गृहप्रवेश


एखाद्या वास्तुमध्ये दोष असतो म्हणजे काय? याबद्दल आपण आधीच्या ब्लॉगमधून काही अंशी जाणून घेतलं आहे. पण वास्तुदोषाचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याची तीव्रता आज आपण समजून घेणार आहोत.
वास्तुशास्त्राबद्दल बोलत असताना आपण दहा दिशा, गुरुत्वाकर्षण, वैश्विक ऊर्जा अशा अनेक घटकांचा विचार करत असतो. यातील प्रत्येक दिशेशी एक तत्व निगडीत आहे. प्रत्येक ऊर्जेचा मानवी शरीर व मनावर थेट परिणाम असतो. जर यामध्ये असंतुलन निर्माण झालं तर त्याचे विपरीत परिणाम वास्तुमध्ये राहणार्‍या मानवांवर होत असतात.
कुटुंबाला सुख लाभतच नाही, कुठल्याच क्षेत्रात यश येत नाही,घरातील तरुण पिढी वाईट मार्गावर जात असणे,सतत आर्थिक नुकसान होत राहणे,हितशत्रूंपासूनत्रास होणे अशा समस्या ज्या सर्वसामान्य कुटुंबात सहजासहजी दिसून येत नाहीत त्या वास्तुदोष असलेल्या कुटुंबात दिसून येतात. आधी सांगितल्याप्रमाणे,आग्नेय ही अग्नि तत्वाची दिशा आहे, ईशान्य जल तत्वाची आहे तसं सर्वच दिशेला पंचमहाभूतांतील एका तत्वाशी बांधलं गेलं आहे. त्या दिशेत जर गंभीर दोष असतील तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतात. खासकरून घरातील सदस्यांचं मानसिक व शारीरिक आरोग्य ढासाळू शकतं.
आपल्यातील अनेकांनी एक अनुभव नक्की घेतला असेल की, एखाद्या नवीन वास्तूत राहायला गेल्यावर सुरुवातीला थोडं अस्वस्थ वाटत असतं. ज्या लोकांचं स्वतःचं घर नाही व त्या कारणाने सतत नवीन घरात राहायला जावं लागतं अशांनी हा अनुभव नक्की घेतला असेल.नोकरी अथवा इतर निमित्ताने ज्यांना सतत घर बदलायची वेळ येते त्यांना असे अनुभव नवे नाहीत.ज्या वास्तूत आपण राहायला जातो त्या वास्तूचे आपल्यावर परिणाम होत असतात हेच यातून स्पष्ट होतं. कधी कधी एखाद्या घरात राहायला गेल्यावर भरभराट होऊ लागते तर कधी एखादं घर अधोगतीस कारणीभूत ठरतं. यापुढे जाऊन सांगायचं तर काही वास्तु या अशुभ अथवा अरिष्ट आहेत अशा चर्चा आपण ऐकत असतो. एखादा जुना वाडा असो किंवा भौतिकदृष्ट्या चांगलं घर असो, ते लाभत नाही असं म्हणतात. त्या वास्तूत राहणार्‍यांना चित्रविचित्र भास होत असतात, शांत झोप लागत नाही, वाईट स्वप्नं पडत असतात, सतत असुरक्षिततेची जाणीव होत असते वगैरे वगैरे. अशा घटना आपण ऐकतो, वाचतोपण त्याची कारणीमीमांसा करू शकत नाहीत. शिवाय, त्यात काही तथ्य आहे की नाही याबद्दल आपल्याला खात्री नसते. पण वास्तूच्या बांधणीमध्ये खूप मोठे दोष असतील तर ती वास्तु नकारात्मक उर्जेचं केंद्र बनून जाते. काही वास्तूच्या आसपास किंवा ज्या जागेवर वास्तु उभी आहे तेथे नकारात्मक शक्तींचा उगम असू शकतो. जसं मंदिरात प्रसन्नता लाभते तसं काही ठिकाणी अस्वस्थता जाणवू शकते. जर एखाद्या ठिकाणी वाईट उर्जांचा प्रवाह तीव्र असेल तर तेथे मानवी स्वास्थ्य बिघडणे स्वाभाविकच आहे. वास्तुमधील दोषांमुळे इतके गंभीर प्रकार होऊ शकतात आणि महत्वाची बाब म्हणजे ते दोष निवारण करता येतात. जर नवीन जागेत राहायला जाणार असाल तर ती जोखून घ्यावी आणि वास्तूत राहायला जाण्यापूर्वी त्याचे गृहशांतही करून घ्यावी असे संकेत आहेत. वास्तूत राहायला जाण्यापूर्वी वास्तुशास्त्रतज्ञाचा सल्ला घ्यावा. यामागे हेतु एकच की ज्यावेळी एखादं कुटुंब त्या वास्तूत राहायला जातं तेंव्हा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ नयेत.
ज्यावेळी स्त्री लग्न करून गृहप्रवेश करते तो क्षण त्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचा व Turning Point असतो. कारण घरात नव्याने राहायला आलेली स्त्री त्या कुटुंबासाठी गृहलक्ष्मी चं रूप असते. जर वास्तूचा त्या स्त्रीवर सकारात्मक परिणाम होत असेल तर कुटुंबात आनंद व समाधान नांदू लागतं अन्यथा कुटुंबात विभक्तपणाही येऊ शकतो. त्या स्त्री चं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी राहणं महत्वाचं असतं. स्त्रियांचा स्वभाव लग्नानंतर बदलतो असं म्हणतात त्यामागेही कुठेतरी वास्तूतील झालेला बदल हे एक कारण असू शकतं. त्यामुळेच लग्न झाल्यानंतर सत्यनारायन, वास्तुशांत, गृहशांती करण्याचे संकेत आहेत.
जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर वास्तु इतकी महत्वाची ठरणार असेल तर ती वास्तु निर्दोष असावी. शांत, सुखी आणि प्रगतिच्या वाटेवरील जीवनासाठी निर्दोष व संपन्न वास्तूची निवड करावी!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा