शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

रत्नशास्त्र म्हणजे काय ? व त्या पासून तुमच्या जीवनात येणारी भरभराटी


 रत्नशास्त्र ज्याला आपण जेमोलोजी म्हणतो. या शास्त्रामध्ये विविध रत्नांचा अभ्यास आहे. रत्ने ही नैसर्गिकरीत्या आढळून येतात. प्रत्येक रत्नाला स्वतःचा रासायनिक गुणधर्म आहे, रंग आहे आणि किरणोत्सारही आहे. रत्नशास्त्रात या सर्वांचा अभ्यास समाविष्ट आहे. ज्यावेळेस आपण रत्नजडीत अंगठी, लॉकेट अथवा इतर आभूषण वापरतो तेंव्हा त्याचा परिणाम होतोच होतो. मग कोणत्या प्रकारची रत्ने आपण वापरली पाहिजेत जेणेकरून त्याचा आपल्याला सकारात्मक बदल होईल, ती रत्ने अंगठीच्या माध्यमातून वापरली जाणार असतील तर अंगठी कोणत्या बोटात घालावी अशा अनेक बाबींचा अभ्यास रत्नशास्त्रात येतो. राशीरत्न याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो आणि काही प्राचीन हिंदू ग्रंथामध्येसुद्धा याबद्दल वर्णन आहे. याचा अर्थ असा की हे शास्त्र प्राचीन आणि मौल्यवान आहे आणि आपले पूर्वज याचा योग्य वापर अनेक शतकांपूर्वी करत होते.   
            राशीरत्न म्हणजे राशींना अनुकूल असलेले रत्न. एकूण बारा राशींची विभागणी चार तत्वांच्या अनुसार झाली आहे. ते म्हणजे वायु, जल, अग्नि आणि पृथ्वी. या चारही तत्वांचे स्वतःचे गुणधर्म आहेत. जसं अग्नि प्रखर-ज्वलंत आहे, वायु चंचल पण निर्मळ आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राशीला एक स्वामी ग्रह आहे. जसं तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. मग शुक्र ग्रहाचाही एक गुणधर्म आहे, प्रभाव आहे. हा सगळा विचार करून एखाद्या व्यक्तिला कोणतं रत्न अनुकूल असेल जे त्या व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून त्याला फायदेशीर ठरेल हे तपासता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीची जन्मपत्रिका बघून त्याच्यातील गुण-दोष जोखावे लागतील. त्यानंतर त्या व्यक्तीसाठी योग्य तो राशिरत्न निवडावा लागतो. रत्नांचेही प्रकार आहेत. त्या रत्नाच्या रसायनिक गुणधर्माचा, किरणोत्साराचा संतुलितपणे वापर करून घेऊन व्यक्तितील गुणांची वारंवारता वाढवून उणिवा कमी करता येणे शक्य आहे.
रत्नशास्त्राचा प्रभावीपणे वापर करून आयुष्य सुखी आणि समृद्ध करणे शक्य आहे. एखाद्याला आरोग्याच्या बाबतीत तक्रार असतील तर त्यासाठीही काही रत्नांचा वापर करता येऊ शकतो. काही रत्न हे माणसाच्या स्वभावात बदल करायला उपयोगी ठरतात. अतिशय कोपिष्ट असलेल्या व्यक्तींना रागावर नियंत्रण मिळवणे, आत्मविश्वास कमकुवत असणार्‍या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास जागा करणे अशा बाबी रत्नांच्या प्रभावाने होऊ शकतात. आरोग्य, शिक्षण, कला, नोकरी, नातेसंबंध, आर्थिक समस्या अशा अनेक मानवी चिंतेवर रत्नशास्त्र उपयोगी ठरू शकतं. बर्‍याचदा मुलांना अभ्यास करताना लक्ष लागत नाही. त्यांचा स्वभाव चंचल असतो. अशांसाठी चित्त स्थिर व्हावे म्हणून विशिष्ट रत्न ठराविक बोटात घातलं तर त्याचा प्रभाव लागलीच जाणवू शकतो.
जेंव्हा राशीरत्न मानवी शरीराला सतत स्पर्श करत असतात तेंव्हा त्यांच्यातील रासायनिक गुणधर्म आणि किरणोत्सारामुळे त्या व्यक्तीवर परिणाम होतो. जर अंगठीद्वारे ते रत्न वापरलं जात असेल तर कुठल्याही बोटात घालून चालणार नाही कारण प्रत्येक बोटात होणारा रक्तप्रवाह आणि तेथे असणार्‍या शिरांचा उगम वेगवेगळा असतो. असे अनेक संकेत पाळले नाहीत तर रत्नांची परिणामकारकता दिसून येणार नाही. त्यासाठी तज्ञ व्यक्तीकडून या सर्वची आखणी करून घेणे, सल्ला घेणे क्रमप्राप्त आहे. 


सोमवार, १३ जानेवारी, २०२०

ज्योतिषशास्त्राची ओळख भाग २

 मागील भागात आपण ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय? ते कसे काम करते? त्याचा पाया काय आहे? याबद्दल जाणून घेतलं. या भागात त्याबद्दल चे काही गैरसमज आणि त्याचे महत्त्व उदाहरणासह जाणून घेऊ या.
 ज्योतिषशास्त्र खरं की खोटं यावर आजच्या काळात मोठ्या प्रमाणात वाद होतात. पण ज्योतिष हे शास्त्र आहे. जसे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादि आहेत तसेच ज्योतिषशास्त्र आहे. भविष्यात होणार्‍या अनुकूल किंवा प्रतिकूल घटनांचा अंदाज लावण्यासाठी एक गणिती पद्धत अवलंबली आहे. ही पद्धत हजारो वर्षांपासून अवलंबली जाते. आजच्या काळात शेअर बाजारातही अशा काही पद्धती वापरल्या जातात ज्यातून शेअर्सचे भाव वाढणार की पडणार याबद्दल भविष्य वर्तविलं जातं. तोसुद्धा विविध माहितीचे विश्लेषण करून एक प्रकारचा अंदाजच वर्तविला जातो जेणेकरून गुंतवणूकदारांना सतर्क राहता यावे. ज्योतिषशास्त्राचा हेतुही तोच आहे. त्यामुळे काळाच्या कसोटीवर ज्योतिष हे शास्त्र म्हणून सिद्ध झालं आहे.
याबद्दल अलीकडेच एक उदाहरण द्यायचं झालं तर... एका पर्यावरणवादी अभ्यासकाने असं सिद्ध केलं की जगाच्या एका कोपर्‍यात काही फुलपाखरांनी आपले पंख फडकावले नाहीत किंवा त्यांचं योग्य ऋतुत स्थलांतर झाले नाही तर त्यामुळे पर्यावरणावर मोठे परिणाम पडतात. यालाच जोडून सांगायचं तर, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण लहरीमुळे समुद्राला भरती-ओहोटी येतेच. त्याचप्रमाणे योग्य विश्लेषण केल्यास ग्रहांची स्थिति मानवी आयुष्य बदलण्याची शक्ति ठेवते.

ज्योतिषशास्त्राचे महत्व
प्रत्येकाला स्वतःच्या विवंचना असतात. आयुष्य जगत असताना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागत असतो. आयुष्य नेमकं कोणत्या दिशेने जात आहे हेही कधी-कधी लक्षात येत नाही. अथांग समुद्रात एकट्याच भरकटणार्‍या एखाद्या नावेप्रमाणे ते जिकडे प्रवाह असेल त्या दिशेने वाहत जात असतं. कारण काय चुकत आहे आणि काय केलं पाहिजे या दोन प्रश्नांची उत्तरेच मिळत नाहीत. माणसाचं आयुष्य हे एकट्याचं नसतं तर त्याच्या कुटुंबावरही त्याचा परिणाम होत असतो. या सर्व प्रश्नांचा मागोवा घेऊन उत्तरापर्यन्त पोहोचण्यात आपल्याला ज्योतिषशास्त्र मदत करू शकतं. आपल्याला आरोग्याच्या समस्या असतील, वैवाहिक प्रश्न, आर्थिक चणचण,नोकरीची चिंता,मनशांती मिळत नसेल,सतत अपयश व अवमानाचा सामना करावा लागत असेल,इतरांच्या त्रासाने जीवन नकोसं वाटत असेल अशा छोट्या ते मोठ्या प्रत्येक अडचणीवर मार्ग काढताना ज्योतिषशास्त्र उपयुक्त ठरू शकतं.
आधी नमूद केल्याप्रमाणे,ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवरुन मानवी आयुष्यावर होणारे परिणाम शोधले जातात. प्रत्येक ग्रहाचा एक गुणधर्म आहे. काही ग्रह कलेला पूरक आहेत, काही कर्तव्याला, काही बुद्धीला तर काही आरोग्याला. ते ग्रह सध्या कोणत्या कक्षेत आहेत, कोणत्या नक्षत्रात आहेत हे पाहणे महत्वाचे ठरते. व्यक्तीची जन्मवेळ व ठिकाण अचूकपणे माहीत असेल तर त्याच्या जन्माच्या वेळेस ग्रहस्थिती कशी होती आणि आज कशी आहे याचे विश्लेषण केले जाते. आजची ग्रहांची स्थिती अनुकूल आहे की प्रतिकूलयाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार कोणता ग्रह त्रासदायक ठरत आहे, अडचणी निर्माण करत आहेहे निष्पन्न झाल्यास त्यावर काय उपाययोजना करता येतील हे पहावे लागते. कोणते ग्रह कोणत्या कालावधीत चांगलं फळ देऊ शकतात याचाही अभ्यास करता येतो ज्याच्या अनुसार निर्णय घेणं सोपं जातं.
कुठलेही एका जागी ग्रह स्थिर असत नाहीत. त्यांचं स्वतःभोवती परिवलन आणि सूर्याच्या भोवती परिभ्रमन सुरू असतं. कधी-कधी हे ग्रह एकमेकांच्या सरळ रेषेत येतात तर कधी विशिष्ट कोनातून प्रवास करत असतात. त्यांचं एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेतील भ्रमण सुरूच असतं. ग्रहांचं हे संक्रमण मोठं स्थित्यंतर घडवणारं असतं. कधी ते मानवी स्वभावातील सय्यम पहातं, कधी चिकाटी, कधी मोह, व्यसन, प्रामाणिकपणा, हुशारी, सचोटी तर कधी त्याग! जर माणसाला समजलं की ही स्थिति किती काळ टिकणार आहे तर तो कधी सावध तर कधी निश्चिंत राहू शकतो.
आमच्या पाहण्यात एक व्यक्ति होते ज्यांची कागदनिर्मितीचा कारखाना होता. काही कारणास्तव तो व्यवस्थित चालत नसल्याने ते चिंतित होते. त्यांनी आपली पत्रिका बनवून घेतली आणि ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला. त्यांची जन्मपत्रिका व सद्यस्थिती पाहिली तर असा निष्कर्ष निघाला की पुढील दहा महीने कष्ट देणारे असणार आहेत. पण त्यांनी चिकाटी दाखवली आणि व्यवसाय सांभाळला तर त्यानंतर खूप चांगले दिवस येऊ शकतात. त्यांनी तो निष्कर्ष ऐकला आणि अनुकरण सुरू केलं. पुढील सर्व काळ ते इतर व्यवसायातून अर्थार्जन करून आपला कागदाचा व्यवसाय जपत होते. आणि आश्चर्याची बाब म्हणजे दहा ते अकरा महिन्यांच्या नंतर प्लॅस्टिकबंदी झाली आणि कागदाला मागणी वाढली. त्यानंतर त्यांचा व्यवसाय वाढला. हा केवळ योगायोग नव्हता. त्यांच्या आयुष्याबद्दल मिळालेल्या संकेताच्या आधारे विचारपूर्वक अवलंबलेला मार्ग होता. याचा अर्थ असा होत नाही की प्लॅस्टिकबंदी होणार हे पत्रिकेतून समजलं होतं, पण सद्यस्थितीत त्यांचे ग्रह अनुकूल नव्हते आणि दहा महिन्यांनी त्यांना अनुकूल असणारी घटना घडणार होती. तोपर्यंत त्यांना सय्यम बाळगावा लागणार होता. जर प्लॅस्टिकबंदी झाल्यावरही ते ग्रहस्थ आराम करत बसले असते तर तो त्यांचा दोष होता, पण त्यांना अनुकूल असणारी घटना घडताच त्यांना जोमाने कष्ट करणे गरजेचे आहे. त्यांना दिशा देण्याचं काम ज्योतिषशास्त्राने केलं. अशा पद्धतीने दिशा देण्याचं आणि निर्णय घेताना उपयुक्त ठरणारं भविष्य ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जाणून घेता येतं

ज्योतिषशास्त्राची ओळख भाग १


        मित्रांनो, आज जर तुम्हाला कोण सांगितलं की पृथ्वी या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि इतर ग्रह त्याच्याभोवती फिरत आहेत आणि सूर्यही पृथ्वीभोवती भ्रमण करत आहे तर तुम्हाला ते पटेल का? तर नाही पटणार. कारण सूर्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह भ्रमण करत आहेत हे सिद्ध झालेलं विज्ञान आहे. मात्र,तीन शतकांपूर्वी तर अशीच मान्यता होती की पृथ्वीभोवती सूर्य व इतर ग्रह फिरत असतात. तशा परिस्थितीतही, म्हणजे जेंव्हा दुर्भिण व इतर कुठल्याही आधुनिक साधनांचा शोध लागला नव्हता तेंव्हा हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीं-महर्षींनी ब्रम्हांडात भ्रमण करणार्‍या ग्रहांची, त्यांच्या भ्रमनाची, त्यांच्यागतीची,गुणधर्मांची माहिती घेतली आणि असं एक शास्त्र विकसित केलं ज्याच्या आधारावर पृथ्वीवर राहणार्‍या मानवाच्या भविष्याबद्दल अंदाज वर्तविता येऊ शकतो. होय, आपण बोलत आहोत ज्योतिषशास्त्राबद्दल!
            भविष्य हे प्रत्येक माणसाला खुणावत असतं. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याची उत्सुकता आणि भीती माणसाला असतेच. ही भीती आणि उत्सुकता आजची नाही, तर शतकानुशतके अन पिढ्यानपिढ्या ती चालत आली आहे. भविष्य हा असा एकमेव धागा आहे जो मानवासाठी किंवा ब्रम्हांडातील प्रत्येक सजीवासाठी महत्वाचा ठरला आहे.याच भविष्याचा वेध घेता यावा, अंदाज लावता यावा आणि त्यातून अनुकूलता-प्रतिकूलता लक्षात घेऊन सावधानतेने मार्गक्रमण करावे यासाठी ज्योतिषशास्त्र अत्यंत महत्वाचं आहे.
ज्योतिषशास्त्रात प्रामुख्याने ग्रहांचा, त्यांच्या गतीचा,त्यांच्या गुणधर्माचा आणि पर्यायाने त्यांचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव याचा अभ्यास केला आहे. ज्योतिषशास्त्र ही एक वैदिक कालीन महत्वाची विद्या आहे. वेदांना जाणून घेण्यास मदत व्हावी म्हणून ज्या सहा वेदांगांची रचना झाली त्यातील ज्योतिष ही एक विद्या आहे. याशिवाय, ज्योतिष हे प्राचीन कालीन खगोलशास्त्रीय ज्ञानाशी निगडीत आहे. कालानुरूप यामध्ये चांगले-वाईट प्रवाह मिसळत गेले.
ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू या ग्रहांचा अभ्यास आहे. सूर्याभोवती हे सर्व ग्रह भ्रमण करत असतात. प्रत्येकाच्या भ्रमणाचा कालावधी, वेग वेगवेगळा आहे. त्या प्रत्येक ग्रहाची रचना,गुरुत्वाकर्षण, ऊर्जा, चुंबकीय क्षेत्र इत्यादि वेगवेगळे आहे. ज्योतिषशास्त्रात या सर्वांना एका गणिती सूत्रात बांधलेलं आहे. १२ राशी आणि २७ नक्षत्रांच्या रूपात. त्यानुसार, एखादा ग्रह संक्रमण करत असताना तो कोणत्या कक्षेतून भ्रमण करतो, कोणत्या राशीत असतो, कुठल्या नक्षत्रात असतो याचं विश्लेषण करून राशिफळ निश्चित केलं जातं आणि त्यावरून भविष्याच्या संबंधित अंदाज व्यक्त केले जातात. एखादा व्यक्ति जन्मतो तेंव्हा आकाशात ग्रहांची स्थिती काय होती व ती सध्या कशी आहे याचा संयुक्तपणे अभ्यास करून माहितीचं विश्लेषण केलं जातं आणि त्यावरून पुढील काळातील घटनांचा अनुक्रम काय असू शकतो याबद्दल तर्क लावले जातात. यालाच फलज्योतिष म्हणतात! मागील भागात आपण ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय? ते कसे काम करते? त्याचा पाया काय आहे? याबद्दल जाणून घेतलं. या भागात त्याबद्दल चे काही गैरसमज आणि त्याचे महत्त्व उदाहरणासह जाणून घेऊ या

सोमवार, ६ जानेवारी, २०२०

अंकशास्त्र म्हणजे काय ? जाणून घ्या अंकशास्त्राची ओळख आणि मार्गदर्शक


 व्यक्ति तितक्या प्रकृती! असं आपण अनेकदा ऐकतो. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख आहे. स्वभाव, राहणीमान, आवड, क्षमता, गुण-दोष अशा अनेक बाबींवर प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ठरते. त्यानुसारच आपण त्या व्यक्तिला ओळखत असतो. अंकशास्त्र हे असं शास्त्र आहे ज्याद्वारे कुठल्याही व्यक्तीची प्रकृती कशी आहे याचा अंदाज बांधता येतो.
अंकशास्त्र हे कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारीख, नाव याच्या आधारे त्या व्यक्तीची प्रकृती, स्वभाव, गुण-दोष वगैरे जोखण्याचे शास्त्र आहे. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रात दिशा,गुरुत्वाकर्षण, ऊर्जा इत्यादींचा अभ्यास आहे त्याप्रमाणे अंकशास्त्रात स्वाभाविकच अंकांचा अभ्यास आहे. प्रत्येक दिशेचा काहीतरी गुणधर्म असतो आणि तो परिणामकारक असतो त्याच पद्धतीने प्रत्येक अंक (उदाहरणार्थ 3) हा आपला स्वतंत्र गुणधर्म राखून असतो जो व्यक्तीवर परिणाम करणारा असतो. अंकशास्त्रात 1 ते 9 या अंकाचा अभ्यास आहे. या प्रत्येकाचे विशिष्ट गुण-दोष आहेत. ते विशिष्ट व्यक्तिबद्दल काय सांगतात आणि ते त्या व्यक्तीवर कसे परिणाम करतील याचा तंत्रशुद्ध अभ्यास करणे अंकशास्त्रात समाविष्ट आहे.
जन्मांक आणि भाग्यांक!                              
            अंकशास्त्रात जन्मांक आणि भाग्यांक हे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत असं म्हणता येईल. यासोबत मग नामांक हा विषयही प्रामुख्याने अभ्यासात येतो. प्रत्येक व्यक्तिला जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण असतंच. त्यामध्ये जन्मतारीख यावरून जन्मांक आणि भाग्यांक शोधता येतात. जर समजा अभिषेक नावच्या व्यक्तीची 12/09/1991 ही जन्मतारीख आहे. तर जन्मदिवस 12 यावरून आपल्याला जन्मांक काढता येतो. 1+2=3 हा तो जन्मांक असेल. जर तारीख 1 ते 9 असेल तर तोच त्याचा जन्मांक असेल. भाग्यांक हा पूर्ण जन्मतारखेवरून काढावा लागतो. म्हणजे सदरील व्यक्तीच्या बाबतीत 12/09/1991 यावरून 1+2+0+9+1+9+9+1=5 हा त्याचा भाग्यांक झाला. नामांक जर शोधायचा असेल तर ABHISHEK या नावावरून तो शोधता येईल. प्रत्येक Character हे Alphabet Series मध्ये कोणत्या क्रमांकावर आहे ते शोधून त्यांची बेरीज करणे. त्या सूत्रानुसार ABHISHEK चा नामांक...
A: 1
B: 2
H: 8
I: 9
S: 19:1+9=10=1+0=1
H: 8
E: 5
K: 11:1+1=2
सर्वांची बेरीज 36: 3+6=9
म्हणून नामांक झाला 9.
                                    जन्मांक, भाग्यांक आणि नामांक यांच्या आधारे त्या व्यक्तीचा नैसर्गिक स्वभावगुण समजतो. हे अंक त्याच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. त्या अंकांचे म्हणून जे गुण-दोष आहेत ते त्या व्यक्तिला चिकटलेले असतात.
अंकशास्त्रातून काय साध्य करता येतं? असा जर प्रश्न असेल तर बरंच काही असं त्याचं उत्तर असेल. अंकशास्त्राच्या आधारे त्या व्यक्तितील गुण-दोष, क्षमता,स्वभाव याचा अंदाज लावल्यानंतर त्या व्यक्तीने कोणत्या क्षेत्रात करियर करावे, नोकरी करावी की व्यवसाय करावा,नोकरी कोणत्या क्षेत्रात करावी, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काय करावे,जोडीदार निवडताना तो कसा असावा अशा अनेक बाबतीत निर्णय घेताना सुस्पष्टता येते. वाट खडतर आहे की चांगली आहे की आणखी कशी आहे याबद्दल आधीच माहिती मिळते तेंव्हा आपण पूर्ण तयारीनिशी व संसाधणासहित प्रवास सुरू करतो. एकंदरीतच, उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर भविष्यात काय निर्णय घ्यावेत जेणेकरून यश मिळवणे सोपे जाईल, समाधानाच्या मार्गाने वाटचाल करता येईल, आर्थिक समृद्धि कशी नांदेल अशा विविध बाजूंनी वाटचाल करताना अंकशास्त्र मोलाचे मार्गदर्शन करते.
अंकशास्त्रावरून जे सध्या आहे(याचा अर्थ सध्याची परिस्थिति आणि सध्याच्या त्या माणसाच्या क्षमता व मर्यादा) त्यामध्ये बदल कसा करता येईल हा एक महत्वाचा प्रश्न असतो. आधी सांगितल्याप्रमाणे,प्रत्येक अंकाचा गुणधर्म आहे; त्याचे गुण-दोष आहेत. ते त्या व्यक्तीवर कसे परिणाम करतील हे सांगता येईल. मग असलेल्या गुणांची वारंवारता वाढवणे आणि दोषांची परिणामकारकता कमी करणे शक्य आहे. म्हणजे एखादा महिना त्या व्यक्तीसाठी कसा असेल याबद्दल अंदाज आला तर त्या महिन्यात मोठे निर्णय घ्यावेत किंवा घेऊ नयेत हे ठरवता येईल. कोणती तारीख ही लाभदायक आहे ते पाहून निर्णय घेता येतील. जोडीदाराशी पटत नसेल तर त्या दोघांच्या अंकशास्त्रानुसार काय बदल केले पाहिजेत यावर विचार करता येईल. व्यवसायात भागीदार निवडायचा असेल तर त्याबाबतही अंकशास्त्राची मदत होईल. नावात बदल केला तर नामांक बदलेल आणि त्याने जर काही फायदा होत असेल तर तोही मार्ग आहे.
अंकशास्त्र हे उपयुक्त अशासाठी आहे की त्यात त्या व्यक्तिबद्दल लागणारी माहिती फार कमी आहे. म्हणजे त्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्म वेळ, ठिकाण, नाव ही माहितीच प्रामुख्याने लागते. मिळणार्‍या माहितीचं तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने योग्य विश्लेषण केल्यास त्याचा फायदा त्या व्यक्तिला नक्कीच होतो.