सोमवार, ६ जानेवारी, २०२०

अंकशास्त्र म्हणजे काय ? जाणून घ्या अंकशास्त्राची ओळख आणि मार्गदर्शक


 व्यक्ति तितक्या प्रकृती! असं आपण अनेकदा ऐकतो. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख आहे. स्वभाव, राहणीमान, आवड, क्षमता, गुण-दोष अशा अनेक बाबींवर प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ठरते. त्यानुसारच आपण त्या व्यक्तिला ओळखत असतो. अंकशास्त्र हे असं शास्त्र आहे ज्याद्वारे कुठल्याही व्यक्तीची प्रकृती कशी आहे याचा अंदाज बांधता येतो.
अंकशास्त्र हे कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारीख, नाव याच्या आधारे त्या व्यक्तीची प्रकृती, स्वभाव, गुण-दोष वगैरे जोखण्याचे शास्त्र आहे. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रात दिशा,गुरुत्वाकर्षण, ऊर्जा इत्यादींचा अभ्यास आहे त्याप्रमाणे अंकशास्त्रात स्वाभाविकच अंकांचा अभ्यास आहे. प्रत्येक दिशेचा काहीतरी गुणधर्म असतो आणि तो परिणामकारक असतो त्याच पद्धतीने प्रत्येक अंक (उदाहरणार्थ 3) हा आपला स्वतंत्र गुणधर्म राखून असतो जो व्यक्तीवर परिणाम करणारा असतो. अंकशास्त्रात 1 ते 9 या अंकाचा अभ्यास आहे. या प्रत्येकाचे विशिष्ट गुण-दोष आहेत. ते विशिष्ट व्यक्तिबद्दल काय सांगतात आणि ते त्या व्यक्तीवर कसे परिणाम करतील याचा तंत्रशुद्ध अभ्यास करणे अंकशास्त्रात समाविष्ट आहे.
जन्मांक आणि भाग्यांक!                              
            अंकशास्त्रात जन्मांक आणि भाग्यांक हे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत असं म्हणता येईल. यासोबत मग नामांक हा विषयही प्रामुख्याने अभ्यासात येतो. प्रत्येक व्यक्तिला जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण असतंच. त्यामध्ये जन्मतारीख यावरून जन्मांक आणि भाग्यांक शोधता येतात. जर समजा अभिषेक नावच्या व्यक्तीची 12/09/1991 ही जन्मतारीख आहे. तर जन्मदिवस 12 यावरून आपल्याला जन्मांक काढता येतो. 1+2=3 हा तो जन्मांक असेल. जर तारीख 1 ते 9 असेल तर तोच त्याचा जन्मांक असेल. भाग्यांक हा पूर्ण जन्मतारखेवरून काढावा लागतो. म्हणजे सदरील व्यक्तीच्या बाबतीत 12/09/1991 यावरून 1+2+0+9+1+9+9+1=5 हा त्याचा भाग्यांक झाला. नामांक जर शोधायचा असेल तर ABHISHEK या नावावरून तो शोधता येईल. प्रत्येक Character हे Alphabet Series मध्ये कोणत्या क्रमांकावर आहे ते शोधून त्यांची बेरीज करणे. त्या सूत्रानुसार ABHISHEK चा नामांक...
A: 1
B: 2
H: 8
I: 9
S: 19:1+9=10=1+0=1
H: 8
E: 5
K: 11:1+1=2
सर्वांची बेरीज 36: 3+6=9
म्हणून नामांक झाला 9.
                                    जन्मांक, भाग्यांक आणि नामांक यांच्या आधारे त्या व्यक्तीचा नैसर्गिक स्वभावगुण समजतो. हे अंक त्याच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. त्या अंकांचे म्हणून जे गुण-दोष आहेत ते त्या व्यक्तिला चिकटलेले असतात.
अंकशास्त्रातून काय साध्य करता येतं? असा जर प्रश्न असेल तर बरंच काही असं त्याचं उत्तर असेल. अंकशास्त्राच्या आधारे त्या व्यक्तितील गुण-दोष, क्षमता,स्वभाव याचा अंदाज लावल्यानंतर त्या व्यक्तीने कोणत्या क्षेत्रात करियर करावे, नोकरी करावी की व्यवसाय करावा,नोकरी कोणत्या क्षेत्रात करावी, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काय करावे,जोडीदार निवडताना तो कसा असावा अशा अनेक बाबतीत निर्णय घेताना सुस्पष्टता येते. वाट खडतर आहे की चांगली आहे की आणखी कशी आहे याबद्दल आधीच माहिती मिळते तेंव्हा आपण पूर्ण तयारीनिशी व संसाधणासहित प्रवास सुरू करतो. एकंदरीतच, उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर भविष्यात काय निर्णय घ्यावेत जेणेकरून यश मिळवणे सोपे जाईल, समाधानाच्या मार्गाने वाटचाल करता येईल, आर्थिक समृद्धि कशी नांदेल अशा विविध बाजूंनी वाटचाल करताना अंकशास्त्र मोलाचे मार्गदर्शन करते.
अंकशास्त्रावरून जे सध्या आहे(याचा अर्थ सध्याची परिस्थिति आणि सध्याच्या त्या माणसाच्या क्षमता व मर्यादा) त्यामध्ये बदल कसा करता येईल हा एक महत्वाचा प्रश्न असतो. आधी सांगितल्याप्रमाणे,प्रत्येक अंकाचा गुणधर्म आहे; त्याचे गुण-दोष आहेत. ते त्या व्यक्तीवर कसे परिणाम करतील हे सांगता येईल. मग असलेल्या गुणांची वारंवारता वाढवणे आणि दोषांची परिणामकारकता कमी करणे शक्य आहे. म्हणजे एखादा महिना त्या व्यक्तीसाठी कसा असेल याबद्दल अंदाज आला तर त्या महिन्यात मोठे निर्णय घ्यावेत किंवा घेऊ नयेत हे ठरवता येईल. कोणती तारीख ही लाभदायक आहे ते पाहून निर्णय घेता येतील. जोडीदाराशी पटत नसेल तर त्या दोघांच्या अंकशास्त्रानुसार काय बदल केले पाहिजेत यावर विचार करता येईल. व्यवसायात भागीदार निवडायचा असेल तर त्याबाबतही अंकशास्त्राची मदत होईल. नावात बदल केला तर नामांक बदलेल आणि त्याने जर काही फायदा होत असेल तर तोही मार्ग आहे.
अंकशास्त्र हे उपयुक्त अशासाठी आहे की त्यात त्या व्यक्तिबद्दल लागणारी माहिती फार कमी आहे. म्हणजे त्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्म वेळ, ठिकाण, नाव ही माहितीच प्रामुख्याने लागते. मिळणार्‍या माहितीचं तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने योग्य विश्लेषण केल्यास त्याचा फायदा त्या व्यक्तिला नक्कीच होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा