शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

रत्नशास्त्र म्हणजे काय ? व त्या पासून तुमच्या जीवनात येणारी भरभराटी


 रत्नशास्त्र ज्याला आपण जेमोलोजी म्हणतो. या शास्त्रामध्ये विविध रत्नांचा अभ्यास आहे. रत्ने ही नैसर्गिकरीत्या आढळून येतात. प्रत्येक रत्नाला स्वतःचा रासायनिक गुणधर्म आहे, रंग आहे आणि किरणोत्सारही आहे. रत्नशास्त्रात या सर्वांचा अभ्यास समाविष्ट आहे. ज्यावेळेस आपण रत्नजडीत अंगठी, लॉकेट अथवा इतर आभूषण वापरतो तेंव्हा त्याचा परिणाम होतोच होतो. मग कोणत्या प्रकारची रत्ने आपण वापरली पाहिजेत जेणेकरून त्याचा आपल्याला सकारात्मक बदल होईल, ती रत्ने अंगठीच्या माध्यमातून वापरली जाणार असतील तर अंगठी कोणत्या बोटात घालावी अशा अनेक बाबींचा अभ्यास रत्नशास्त्रात येतो. राशीरत्न याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो आणि काही प्राचीन हिंदू ग्रंथामध्येसुद्धा याबद्दल वर्णन आहे. याचा अर्थ असा की हे शास्त्र प्राचीन आणि मौल्यवान आहे आणि आपले पूर्वज याचा योग्य वापर अनेक शतकांपूर्वी करत होते.   
            राशीरत्न म्हणजे राशींना अनुकूल असलेले रत्न. एकूण बारा राशींची विभागणी चार तत्वांच्या अनुसार झाली आहे. ते म्हणजे वायु, जल, अग्नि आणि पृथ्वी. या चारही तत्वांचे स्वतःचे गुणधर्म आहेत. जसं अग्नि प्रखर-ज्वलंत आहे, वायु चंचल पण निर्मळ आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राशीला एक स्वामी ग्रह आहे. जसं तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. मग शुक्र ग्रहाचाही एक गुणधर्म आहे, प्रभाव आहे. हा सगळा विचार करून एखाद्या व्यक्तिला कोणतं रत्न अनुकूल असेल जे त्या व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून त्याला फायदेशीर ठरेल हे तपासता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीची जन्मपत्रिका बघून त्याच्यातील गुण-दोष जोखावे लागतील. त्यानंतर त्या व्यक्तीसाठी योग्य तो राशिरत्न निवडावा लागतो. रत्नांचेही प्रकार आहेत. त्या रत्नाच्या रसायनिक गुणधर्माचा, किरणोत्साराचा संतुलितपणे वापर करून घेऊन व्यक्तितील गुणांची वारंवारता वाढवून उणिवा कमी करता येणे शक्य आहे.
रत्नशास्त्राचा प्रभावीपणे वापर करून आयुष्य सुखी आणि समृद्ध करणे शक्य आहे. एखाद्याला आरोग्याच्या बाबतीत तक्रार असतील तर त्यासाठीही काही रत्नांचा वापर करता येऊ शकतो. काही रत्न हे माणसाच्या स्वभावात बदल करायला उपयोगी ठरतात. अतिशय कोपिष्ट असलेल्या व्यक्तींना रागावर नियंत्रण मिळवणे, आत्मविश्वास कमकुवत असणार्‍या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास जागा करणे अशा बाबी रत्नांच्या प्रभावाने होऊ शकतात. आरोग्य, शिक्षण, कला, नोकरी, नातेसंबंध, आर्थिक समस्या अशा अनेक मानवी चिंतेवर रत्नशास्त्र उपयोगी ठरू शकतं. बर्‍याचदा मुलांना अभ्यास करताना लक्ष लागत नाही. त्यांचा स्वभाव चंचल असतो. अशांसाठी चित्त स्थिर व्हावे म्हणून विशिष्ट रत्न ठराविक बोटात घातलं तर त्याचा प्रभाव लागलीच जाणवू शकतो.
जेंव्हा राशीरत्न मानवी शरीराला सतत स्पर्श करत असतात तेंव्हा त्यांच्यातील रासायनिक गुणधर्म आणि किरणोत्सारामुळे त्या व्यक्तीवर परिणाम होतो. जर अंगठीद्वारे ते रत्न वापरलं जात असेल तर कुठल्याही बोटात घालून चालणार नाही कारण प्रत्येक बोटात होणारा रक्तप्रवाह आणि तेथे असणार्‍या शिरांचा उगम वेगवेगळा असतो. असे अनेक संकेत पाळले नाहीत तर रत्नांची परिणामकारकता दिसून येणार नाही. त्यासाठी तज्ञ व्यक्तीकडून या सर्वची आखणी करून घेणे, सल्ला घेणे क्रमप्राप्त आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा