मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

वास्तुशास्त्र: सुखी जीवनाचं सूत्र


प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात असतो. आयुष्यभर हा शोध सुरूच असतो. पण आयुष्यात एकाच वेळेस सर्व सुख मिळत नसल्याने माणूस समाधानाने जगू शकत नाही. आरोग्य, धन-संपत्ती,नातेसंबंध,शिक्षण या सर्व गोष्टी एकाच वेळेस मिळत नाहीत. एक आहे तर दुसरं नाही अशी अवस्था असते. त्यामुळे समाधानाने जगता येत नाही. पण समाजात असे काही व्यक्ति असतात, अशी काही कुटुंबं असतात ज्यांना समाधान लाभतं! त्यांच्या अशा निस्सीम जगण्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. पण जर याचा सखोल विचार केला तर त्यामागे एक परिपूर्ण वास्तु असल्याचं आढळून येईल. समाधानी आयुष्यासाठी निरोगी शरीर, निरोगी मन आणि पूर्ण कार्यशीलतेने काम करणे महत्वाचं आहे. जर आपली वास्तु दोषमुक्त असेल तर आपण सुखी जीवनाच्या मार्गावर असतो असं खात्रीने म्हणता येईल. ज्या ठिकाणी आपण बहुतांश वेळ राहतो, जेवतो, झोपतो, अभ्यास करतो, महत्वाचे निर्णय घेतो ती वास्तु जर आपल्यावर प्रभाव टाकणारी असेल तर ती निर्दोष व परिपूर्ण असलीच पाहिजे.
आपण आधीच्या ब्लॉगमध्ये वास्तुशास्त्र म्हणजे काय हे जाणून घेतलं होतं. माणसाने स्वतःच्या निवार्‍यासाठी एखादी झोपडी जरी बनवली असेल तरी ती वास्तुच असते. कुठल्याहीवास्तूमध्ये वास्तुशस्त्राप्रमाणे बदल करून ती वास्तु दोषमुक्त केली तर आयुष्यातील अनेक समस्यांमधून सुटका मिळू शकते.आपल्या जीवनात आरोग्य, धनसंपत्ती,नातेसंबंध, शिक्षण, करियर हे सुखाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या प्रत्येक मुद्द्यांचावास्तुशास्त्रात विचार केला गेला आहे. अपयश येणे यामागे अनेक कारणे असू शकतात. पण त्यासाठी स्वतःत बदल करणे हाच उपाय आहे. जर स्वतःमध्ये ते बदल घडवायचे असतील आपल्यावर प्रभाव टाकणार्‍या वास्तूतही ते बदल करणे आवश्यक आहे. आपण पूर्ण क्षमतेने काम करावे,आपल्यातील दोष कमी होऊन क्षमतांचा पूर्ण वापर व्हावा असं वाटत असेल तर आपली वास्तु त्यासाठी अनुकूल असावी लागते हेही तितकेच महत्वाचे आहे.
आपण लहानपणापासून घरातील जेष्ठांकडून ऐकत आलो आहोत की दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, उंबर्‍यावर शिंकू नये, घराचा दरवाजा योग्य योग्य दिशेत योग्य पदात असावा वगैरे. या काही कपोलकलिप्त गोष्टी किंवा अंधश्रद्धा नसून त्यामागे शास्त्रीय कारण आहे. यामागे काहीतरी तर्क आहे. वास्तुशास्त्र अशाच तर्कांच्या आधारे वास्तूची रचना कशी असावी याबद्दल सूचना करत असतं. काही घरांमध्ये सतत कोणीतरी आजारी असतं. एक झालं की दुसरं दुखणं सुरू असतं. अशाने मग त्या कुटुंबाची मनोवस्था आणि आर्थिक स्थितिही बिघडत जाते. काही कुटुंबात सतत कलह होत असतात. अगदी छोट्या-छोट्या प्रसंगावरून भांडणं होतात. काही कुटुंबात पैसे येतात पण ते टिकत नाहीत. कुठल्यातरी निमित्ताने पैशांचा क्षय होत असतो. या अशा घटना अनेक कुटुंबात घडत असतात पण त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कोण करत नाही. वास्तुशास्त्रात याचा अभ्यास केला आहे आणि त्यानुसार उपायही निश्चित केले आहेत. अशा घरात वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार कोणते बदल करावेत जेणेकरून सर्व तक्रारींपासून सुटका करून घेता येईल याबद्दल पूर्ण मार्गदर्शन मिळू शकतं. अगदी साधं सांगायचं झालं तर घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर मोठं झाड असू नये जेणेकरून स्वच्छ सूर्यप्रकाश व हवा येण्यापासून त्याला अवरोध व्हावा. पूर्व ही सूर्याची उगवण्याची दिशा आहे. जर सूर्याची प्रकाशमान किरणे घरात येत असतील तर ती घरातील सदस्यांच्या आरोग्याला उपयुक्तच ठरणारी असतात. असे सामान्य व सहज अवलंबता यावेत असे संकेत पाळले तर मोठी हानी होण्यापासून जपून राहता येतं. घरात नेमकी कोणती समस्या आहे त्याचा अभ्यास करून वास्तूमध्ये कोणते बदल करावेत याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. वास्तुतज्ञच यामध्ये योग्य मदत करू शकतात.
                   माणसाचं भवितव्य हे त्याच्या भूतकाळावर नाही तर त्याचं वर्तमान कसं आहे यावर अवलंबून असतं. अशिक्षित पालकांची मुलं आयएएस, आयपीएस होतात. आरोग्याच्या सर्वच तक्रारी काही आनुवांशिक असत नाहीत. तुमची राहणी, तुमच्यावरील संस्कार, संगत आणि तुमची स्वतःची विचारशैली हे तुमचं भवितव्य ठरवत असते. मानसाच्या जडणघडणीत वास्तूचा मोठा सहभाग असतो.
घर बांधत असताना ते ते वास्तुशास्त्राच्या संकेतनुसार बांधलं तर उचित राहील. पण जर घर बांधून झालं आहे आणि आता जर तुम्हाला वास्तुशास्त्राच्या संकेतांचं अनुकरण करायचं असेल तर राहत्या घरात मोठी तोडफोड करायची गरज नाही. जर आहे त्या घरामध्ये काही बदल केले तरी अपेक्षित फळ मिळू शकतं.देवघराची जागा बदलणे,बैठकीच्या खोलीत थोडेसे बदल करणे,पैसे ठेवायच्या जागेत बदल,अडगळीची खोली बदलणे, घड्याळ-कॅलेंडर योग्य ठिकाणी लावणे असे छोटे-मोठे बदल त्याअंतर्गत येतात. अशा पद्धतीचे अनेक छोटे-मोठे बदल करून परिपूर्ण आणि दोषमुक्त वास्तु आपल्याला चिंतामुक्त करेल.
वास्तुशास्त्र हे आजच्या काळात अतिशय उपयुक्त ठरू शकतं. कारण आपल्याकडे फ्लॅट संस्कृती रुजू लागली आहे. एकाच इमारतीत अनेक फ्लॅट असतात. ते आपल्या मनाजोगे असत नाहीत. तयार असतात त्या स्थितीत आपल्याला घ्यावे लागतात. बिल्डर काही वास्तुविशारद नसतो किंवा त्यांचा दृष्टीकोण व्यावसायिक असल्याने त्यांनी वास्तुशास्त्राच्या संकेतानुसार बांधकाम केलेलं नसतं. मग अशा परिस्थितीत जो फ्लॅट आपण घेतलेला असतो त्यात काही बदल करून ती वास्तु परिपूर्ण बनवणे शक्य आहे. एवढी मोठी वास्तु घेत असताना ती परिपूर्ण असावी असा अट्टहास असणे गैर नाही. ती आपल्याला हवी तशी मिळेल याची शाश्वती नसेल पण ती आपल्यावर हवा तसा प्रभाव टाकू शकते याची काळजी मात्र आपण वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने घेऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा