शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

ज्योतिष आणि गैरसमज


आपण याआधीच्या ब्लॉगमधून ज्योतिष म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली होती. ज्योतिष या शब्दाची फोड ज्योत + भविष्य अशी करता येईल. याचा अर्थ या शास्त्रातून भविष्याचा वेध घेता येतो हे स्पष्ट आहे. पण चित्रपटात दाखवतात तसं ही काही Time Machine नाही की आपण आरपार पाहू शकतो. ज्योतिषशास्त्रात अनेक बाबींचा अभ्यास करून जे निष्कर्ष काढतात तेसंकेत असतात, अंदाज असतात. आयुष्य खूप मोठं आहे. त्यात सर्वांनाच सुखाचा हव्यास आहे. मग या दीर्घ आयुष्यात सुखाकडे वाटचाल करायची असेल तर योग्य मार्गदर्शन असायलाच हवं. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे, कोणते धोके असू शकतात, काय संधी असू शकतात, कोणत्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे, कुठे ठेच लागू शकते आणि कुठे जरासा विसावा घेतला पाहिजे हे सर्व ज्योतिषशास्त्राच्या आधारे जाणून घेता येतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या अभ्यासाअंती असा निष्कर्ष निघू शकतो की येणार्‍या काळात ग्रहमान प्रतिकूल असून पोट, हृदय संबंधित विकार उद्भवू शकतात तर साहजिकच ती व्यक्ति काळजी घेऊन ते टाळू शकते. किंवा जर ग्रहमान अनुकूल असेल आणि पत्रिकेत धनलाभ योग दिसून येत असेल तर ती व्यक्ति व्यवसायात धाडस करू शकते किंवा शेअर मार्केट व इतर क्षेत्रात प्रयत्न करून आर्थिक लाभाच्या संधी हस्तगत करू शकते.
          ज्योतिषशास्त्र हे वैज्ञानिक कसोटीवरही खरं ठरत असताना आणि जगभरात त्याचा अभ्यास केला जात असताना त्याबद्दल अनेक गैरसमज सुद्धा रूढ होत गेले आहेत. लग्न पत्रिकेत मंगळ ग्रह असणे, शनीची साडेसाती,राहूचं भ्रमण अशा बाबतीत ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन वाट्टेल ते उपाय केले जातात. शिवाय, अचानक धनलाभ व्हावा म्हणून तर्‍हेतर्‍हेचे प्रताप केले जातात. आजकालच्या तरुणांमध्ये हव्या त्या व्यक्तिचं प्रेम मिळविण्यासाठीही ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन चित्रविचित्र उद्योग केले जातात. समाजातील अडचणींने ग्रासलेल्या सामान्य मानवांचा गैरफायदा घेणारे लोकही आहेतच. केवळ अशा काही प्रकारांमुळे ज्योतिषशास्त्र, कुंडली याबद्दल समाजात गैरसमज पसरताना दिसून येतात. शेवटी कर्म केल्याशिवाय फलप्राप्तीची अपेक्षा करणे चुकच आहे. ग्रहमान अनुकूल असूनही जर एखादा व्यक्ति प्रयत्न करत नसेल तर त्यातून फळाची अपेक्षा करणे गैरच आहे. आपल्याकडे प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते योग्यच आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे, ज्योतिषचा अर्थ ज्योति+भविष्य असा आहे म्हणजे जिथे ज्योति आहे तिथे प्रकाश आहे; हे प्रकाशमय भविष्याकडे घेऊन जाणारं शास्त्र आहे. तेथे अंधाराकडे घेऊन जाणार्‍या अंधश्रद्धेला थारा नाही. त्यामुळे सर्वांनी सजग राहून योग्य तो पर्याय निवडणे आवश्यक आहे.
ज्योतिषशास्त्राचा अवलंब करून आयुष्यातील अनेक जटिल समस्यांवर मात करता येते. अशक्यही शक्य करता येतं, पण त्यासाठी कृतीशील असणं आवश्यक आहे. आपल्यातील अवगुणांचं ओझं सोडून नवीन दृष्टीकोणातून प्रारंभ करावा लागतो. विधिलिखित बदलता येत नसलं तरी सावध राहून त्यातून मार्ग शोधता येतात. जसं वैद्यकशास्त्र,संगणकशास्त्र हे मानवी हिताचे आहेत तसंच ज्योतिषशास्त्रही.
ज्योतिषशास्त्र शिक्षण, आरोग्य,करियर,धनलाभ,वास्तुसुख, संततीसुख,कौटुंबिक सुख,परदेशवारी, प्रसिद्धी अशा मानवी आयुष्यातील प्रत्येक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण परीक्षण करून योग्य मार्गदर्शन करू शकते. त्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्रातील तज्ञ व्यक्तीकडे जाऊन कसलाही संकोच न करता त्यांना सर्व माहिती दिली पाहिजे जेणेकरून आपल्या आयुष्यात अपेक्षित सुख साधता येईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा