शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

ज्योतिष आणि कर्मफळ

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥

अर्थ: तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको; (पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको.
भगवतगीतेच्या दुसर्‍या अध्यायातील हा श्लोक आहे. भगवंतानेही स्पष्टपणे कर्म करण्यास सांगितलं आहे. जोपर्यंत आपण कर्म करणार नाहीत तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही.
                   ज्योतिषशास्त्र हे आपल्याला योग्य कर्म करण्याची दिशा दाखवणारं शास्त्र आहे. सामान्य माणसाला वाटतं की आकाशातील ग्रह-तारे आपलं भविष्य कसं ठरवू शकतात? पण आकाशातील ग्रह-तारे हे आपल्याला वर्तमानात कोणता मार्ग अवलंबला पाहिजे यासाठीचा प्रकाशमार्ग दाखवत असतात. ज्या काळात आजच्या भौतिकशास्त्राचा किंबहुना दुर्भिणीचाही शोध लागला नव्हता त्याकाळात आपल्या ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्र विकसित केलं आहे. त्याअनुसार भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेता येतो आणि वर्तमानात काय निर्णय घ्यावेत हे समजून येतं. ज्याप्रमाणे हवामान विभाग सांगतो की मोठा पाऊस अथवा वादळ येणार आहे आणि नागरिकांनी घराबाहेर पडू नये त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात कुंडलीचा (पत्रिका) अभ्यास करून त्या व्यक्तीसाठी अनुकूल-प्रतिकूल काळ, स्थळ, क्षेत्र इत्यादीचा अंदाज वर्तवत असतं. जर एखाद्याच्या कुंडलीचा अभ्यास करत असताना असं दिसून आलं की त्या मुलाला/मुलीला शिक्षणात फार गती नाही पण व्यवसाय करण्यास उपयोगी पडणारे सर्व गुण आहेत तर त्या व्यक्तिला प्रथमपासून व्यवसाय क्षेत्रात काम करण्याची मानसिकता तयार करता येते. याचा अर्थ इतकाच की त्या मुलाला/मुलीला कर्म करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी योग्य दिशा समजून आली.
ज्योतिष जाणून घेणं अशासाठी महत्वाचं आहे की, आपण आपलं काम करत असताना, जीवतोड मेहनत करत असताना त्यातून अपेक्षित यश मिळत नसेल तर आपली सगळी मेहनत चुकीच्या दिशेने होत आहे हे समजून येईल. वार्‍याच्या विरुद्ध दिशेने नाव चालवणे जितके कठीण तितकंच कठीण असतं चुकीच्या दिशेने केलेली मेहनत. आजचा काळ हा Smart Work चा आहे. त्यामुळे कमीत कमी कष्ट घेऊन अपेक्षित साध्य साधता येणे शक्य असेल तर तो मार्ग अवलंबला पाहिजे. ज्योतिषशास्त्र त्यात मदत करेल. आपण कोणतं शिक्षण घ्यावं, कोणता व्यवसाय करावा, कोणत्या क्षेत्रात नोकरी करावी, विवाहयोग कधीजुळून येईल ते आरोग्यविषयक काय काळजी घ्यावी या सर्वामध्ये जर ज्योतिषशास्त्राची मदत घेतली तर आयुष्यात अभूतपूर्व बदल होताना दिसून आले आहेत.
ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आपण अनेक बाबींची स्पष्टता मिळवू शकतो. बर्‍याचदा आपण ऐकतो की एखाद्याच्या कुंडलीत राजयोग आहे, परदेशवारीचा योग आहे,धनलाभ संभव आहे,संततीसुख नाही, वाहनसुख नाही,विवाहयोग नाही वगैरे वगैरे. अशा प्रकारचं भविष्य आपण वृत्तपत्रातील राशिभविष्यात किंवा टीव्हीवरील कार्यक्रमात पाहतो. आपल्या राशीत चांगले योग असले तर आनंदाने हुरळून जातो आणि कठीण काळ वर्तविला असेल तर घाबरून जातो. पण एकच रास असणार्‍या दोन व्यक्तींचं आयुष्य काही सारखं असत नाही. कारण प्रत्येकाची कुंडली वेगळं सांगत असते आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं असतं. ज्योतिषशास्त्र हे इतकं उथळ नसून त्यात अतिशय लहानसहान बाबींचा अभ्यास केला आहे. जन्म आपल्या हातात नसतो त्यामुळे कुंडली आपण बदलू शकत नाही. पण कर्म आपल्या हातात असतं. अनुकूल-प्रतिकूल बाबींचा तक्ता मांडून आपण उचित निर्णय घेत गेलो तर कर्माच्या तराजूत आपलं पारडं जड असेल आणि त्याचं अपेक्षित फळही मिळेल.
ज्योतिष हे श्रद्धा किंवा अंधश्रद्धा याचा भाग नसून पूर्णतः शास्त्र असल्याने त्यातून अपेक्षित परिणाम दिसून येणं ही सैद्धांतिक मांडणी आहे. त्याचा यथोचित व गुणात्मक वापर अनेकदा सिद्ध झाला आहे. त्यासाठी अतर्क्य गोष्टी करायची आवश्यकता नसते. योग्य तज्ञाचा सल्ला घेऊन ज्योतिषशास्त्राचा उपयोग आपल्याला आयुष्य सोपं, सुलभ व आनंदी करता येतं. नशिबाला दोषी ठरवण्यापेक्षा योग्य कर्मावर आपला विश्वास असायला हवा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा