रविवार, १२ एप्रिल, २०२०

जीवनाचं GPS - "ज्योतिषशास्त्र" भाग १


आजचा युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. मानवाने जशी जशी प्रगती केली त्यामध्ये तंत्रज्ञानातील नवीन संशोधनाने सामान्य माणसाचं आयुष्यही बदलून गेलं. ज्यावेळी विज्ञानाचा उपयोग सामान्य माणसाचं आयुष्य सोपं करण्यात होऊ लागतो तेंव्हा समाज व्यापक दृष्टीने परिपूर्ण होत जातो. मानवाच्या अशाच एका शोधापैकी एक आहे GPS! म्हणजे Global Positioning System! एक अशी यंत्रणा जी माणसाला दिशादर्शक ठरते. याचा वापर आपण अनेकदा केला आहे. गावाला जाताना रस्ता शोधण्यासाठी असेल किंवा गावातच एखादा पत्ता शोधत असताना आपण अगदी सहजरीत्या मोबाइल काढतो आणि त्यात मार्ग शोधतो. त्यात आपल्या आजूबाजूचा परिसर दिसतो, आपण सध्या कुठे आहोत याचं अवलोकन होतं आणि आपल्याला जिथे जायचं आहे तिथे जाण्यासाठी सहज सोपा मार्ग कोणता हेही दिसतं. एकंदरीत, आपल्या लक्षापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळतं. या घटनेत आपण त्या यंत्राचे, त्या संशोधनाचे केवळ एकतर्फी उपभोगते असतो. आपण ना त्याचा निर्माण केला आहे किंवा त्यामागील विज्ञानही आपल्याला माहीत नसतं. पण त्यावर अंधपणे विश्वास ठेवत आपण त्याचा सल्ला ऐकतो. असं असलं तरी त्यामागे एक प्रक्रिया असते आणि अनेक शास्त्रज्ञांचा, इंजीनियरचा सहभाग असतो. सॅटेलाइट निर्माण करून तो अवकाशात सोडणे आणि त्यानुसार पृथ्वीवरील सर्व Geographical परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं.
ज्याप्रमाणे GPS हे आपल्या भौगोलिक सद्यस्थितीची माहिती देत असतं, योग्य दिशादर्शक असतं त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र हे आपल्या आयुष्यात एक दिशादर्शक म्हणून काम करू शकतं. प्राचीन काळातील ऋषीमुनींच्या तपस्येनंतर आणि आधुनिक काळातील संशोधकांच्या अभ्यासानंतर ज्योतिषशास्त्र आज एक परिपूर्ण शास्त्र म्हणून आपल्यासमोर एक मार्गदर्शक म्हणून उपलब्ध आहे. आपला जन्म जरी आपल्या हातात नसला तरी आपलं आयुष्य कसं असावं याबद्दल आपला अट्टहास उपयोगी पडू शकतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पाच महत्वाच्या गोष्टी असतात ज्यापासून सुख मिळावं अशी त्याची अपेक्षा असत. त्यापैकी आयुष्यात सर्वात आधी येतं ते शिक्षण! त्यानंतर आरोग्य! मग धनसंपत्ती. त्यानंतर घर. आणि या सगळ्यात महत्वाचं असतं ते कुटुंब व कौटुंबिक नातेसंबंध!
ज्योतिषशास्त्रात या सर्व बाबतील उत्तम मार्गदर्शन मिळू शकतं. ज्योतिषशास्त्र तुम्हाला तंतोतंत भविष्य सांगत नाही आणि तशी अपेक्षाही कोणी ठेऊ नये. कारण आपली कर्मचं आपलं भविष्य ठरवत असतात. पण ज्योतिषशास्त्र आपल्याला समाधानी आयुष्याचे मार्ग दाखवू शकतं. कोणत्या मार्गावर खाचखळगे आहेत, कुठे आपण सावध असलं पाहिजे, कुठे सुसाट वेगाने धावलं पाहिजे, कधी विश्रांती घेतली पाहिजे, कुठे काळजी घेतली पाहिजे या सर्वांची माहिती आपल्याला ज्योतिषशास्त्रातून मिळू शकते.
प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष सुरू होतो तो शिक्षणापासून! आपल्याकडे लहानपणापासून शिक्षणाच्या बाबतीत दबाव पाहायला मिळतो. पण शिक्षण हे असं क्षेत्र आहे जेथे आवडीतून निवड झाली तर त्यात प्रचंड यश मिळू शकतं. आपण असे अनेक मुलं-मुली बघतो जे सर्व सोयीसुविधा असूनही त्यातून त्यांना शिक्षणात यश मिळत नाही. कारण त्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण मिळत नसल्याने त्यांचा त्यात रसच नसतो. जर त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला आणि त्यांचा रस, आवड, गती कशात आहे हे जर समजलं तर त्यांना योग्य वेळी योग्य शिक्षण देण्याची सोय करता येते. आपल्या शिक्षणावरच आपलं भवितव्य घडत असतं. त्याच्याबद्दल जर योग्य दिशा समजली तर संपूर्ण आयुष्यात त्याचा मोठा फायदा होतो.
शिक्षणानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तो पैसा! पैसा ही आजच्या काळाची गरज आहे असं म्हणता येईल. कारण पैसा असेल तरच तुम्हाला समाजात प्रतिष्ठा असते आणि आणि सुखवस्तू आयुष्य जगता येतं. पण पैसा प्रत्येकाच्या नशिबी नसतो. कितीही मेहनत केली तरी त्यात यश येत नाही. असं अनेकांसोबत होत असतं. याचा जर व्यवस्थित विचार केला तर यातूनही सुटका मिळवता येते. ग्रहांची पत्रिकेतील स्थिति पाहून योग्य वेळ आणि संधीची माहिती मिळाली तर यश मिळवणे अशक्य नाही. अर्थात, त्यासाठी मेहनत आवश्यक आहेच. पण कोणत्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल ज्योतिषशास्त्र आपल्याला फायदेशीर ठरू शकतं.
प्रत्येकाचं एक स्वप्नं असतं. स्वतःचं घर असावं! समाधानी आयुष्य जगत असताना स्वतःचं संपन्न घर असणं आवश्यक मानलं जातं. शिवाय ते घर वास्तुशास्त्राला अनुसरून असेल तर आयुष्य समाधानाने जगणं शक्य होतं. पण अनेकांना वास्तुसुख नसतं. काहींकडे पैसा नसल्याने घर घेणं शक्य होत नाही तर काहींकडे पैसा असूनही चांगली वास्तु मिळत नाही. चांगल्या वास्तुचा योग जुळून आला पाहिजे असं म्हणतात. ज्योतिषशास्त्र या बाबतीतही पूर्ण समाधान करू शकतं. कुंडलीत वास्तुयोग केंव्हा आहे याचा अभ्यास करून त्या काळात चांगल्या वास्तुसाठी प्रयत्न केले तर ती मिळतेच मिळते! येथेही ज्योतिषशास्त्र आपल्याला GPS प्रणाली प्रमाणे आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जाते.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा