सोमवार, ६ एप्रिल, २०२०

लॉक डाउन, आपली वास्तू आणि घ्यावयाची काळजी


मित्रांनो, सध्या कोरोना विषाणूचा उत्पात सुरू असल्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात Lockdown ची अंमलबजावणी केली जात आहे. पुढील एक महिना तरी आपल्या सर्वांना आपल्या वास्तुतच बंदिस्त होऊन रहावं लागणार आहे. गेल्या अनेक ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेत आलो आहोत की वास्तू ही त्या वास्तूत राहणाऱ्या सर्वांवर परिणाम करत असते. आता तर आपल्याला त्याच वास्तूत सलग रहायचं आहे. याच निमित्ताने आज आपण काही वास्तू टिप्स जाणून घेऊया जेणेकरून आपली वास्तू दोषमुक्त होण्यास मदत होईल. छोटे-छोटे बदल करून आपण अनेक आजारांना उंबरठ्याबाहेर ठेऊ शकतो आणि सध्या जे "Work From Home" करत आहोत त्यातही कार्यक्षमपणे यशस्वी होऊ शकतो.

सर्वप्रथम आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत.

घरातील जी अडगळ आहे त्यापासून मुक्त होणं गरजेचं आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत असतं. जर घराच्या आग्नेय किंवा ईशान्येकडील कोपऱ्यात अडगळ असेल तर तातडीने ती मोकळी करावी. त्याची जागा घराच्या नैऋत्येस आहे.

घरात सकाळचा सूर्यप्रकाश येणे फार आवश्यक असते. त्यामुळे पूर्वेकडील दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवाव्या. दक्षिणेकडे असलेले दरवाजे, खिडक्या बंद ठेवाव्यात. उत्तरेकडील खिडकी, दरवाजे उघडे ठेवणेही उपयुक्त ठरते. एकंदरीत, घरात स्वच्छ व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी हवा खेळती राहिली पाहिजे यासाठी हे प्रयत्न असतील.

रोगाशी लढायचं असेल तर आपली प्रतिकारशक्ती वाढवणेही गरजेचे आहे. त्यासाठी नित्यनेमाने सकाळी पूर्वेकडे तोंड करून प्राणायाम व योगासने करावीत. याने केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते.

घरातील जेष्ठ व्यक्तींची अशा परिस्थितीत काळजी घेणे महत्वाचे असते. घरातील जेष्ठांची झोपण्याची जागा ही शक्यतो उत्तर-पश्चिम दिशेने असणे आवश्यक आहे. त्यांना इमारतीच्या पीलरजवळ, जिना किंवा बीम अशा रचनेखाली झोपू अथवा बसू देऊ नये.

रात्री झोपत असताना दक्षिणेकडे डोकं करून झोपण्याचा सल्ला आपले वाडवडील आधीपासूनच देत असतात. वास्तुशास्त्रात याचंही शास्त्रीय विवेचन करण्यात आले आहे. असं केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण योग्य राहतं, झोप चांगली लागते व दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते.

वास्तूतील आग्नेय व ईशान्य दिशा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आग्नेय ही अग्नीची दिशा आहे तर ईशान्य ही जलतत्वाशी बांधील आहे. ईशान्येकडील खोलीत झोपणे, काम करणे सर्वथा टाळावे. आग्नेय दिशेस जर तुपाचा दिवा प्रज्वलित केला किंवा कापूर वडी लावली तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. जर हे दोन तत्व असंतुलित असतील तर आरोग्य समस्या वाढू शकतात. त्यामुळे वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊन यावर उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरेल.

याशिवाय घरात बांबूचे रोप आणून ठेवणेही फायद्याचे ठरते ज्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते. तुळशीचे रोप हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते. वास्तुशास्त्रात त्याचेही संदर्भ आढळतात. घरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कृष्णतुळस असावी.

घरातील हवा शुद्ध राहावी आणि घराचे निर्जंतुकीकरण व्हावे यासाठी घरच्या आग्नेय कोपर्‍यात तुपाचा दिवा लावला तर फायदा होऊ शकतो. याशिवाय, कापूर प्रज्वलन हेसुद्धा निर्जंतुकीकरण करण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतो.

जी मंडळी सध्या घरात बसून काम करत आहेत त्यांनी उत्तर दिशेकडे तोंड करून काम करावे. घराच्या वायव्य कोपऱ्यात बसून काम केले तर अजून फायदा होऊ शकतो.

जी मंडळी Work From Home करत आहेत त्यांना स्वतःची मनस्थिती जपणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाशात बसून काम करणे उत्तम होईल. त्यासोबत उत्तर व पूर्व दिशेला असलेला दरवाजा, खिडकी उघडी ठेऊन काम करावे.

वास्तुशास्त्रात आरोग्यसंपदा व अर्थसंपदा याबाबत सखोल माहिती दिली आहे. त्याचे योग्य अनुकरण केले तर त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल घडवून आणता येऊ शकतो. येथे केवळ वास्तुशास्त्रात नमूद असलेल्या टिप्स आहेत. वास्तुशास्त्रात यापेक्षा अजून बरेच उपाययोजना आहेत ज्यांचं अनुकरण केलं तर त्याचा मोठा लाभ आपल्याला होऊ शकतो. पण त्यासाठी वास्तूशास्त्रतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा