कुठलीही मानवनिर्मित जागा
ही वास्तु असते. त्या वास्तूच्या रचनेनुसार एकतर ती वास्तु लाभते किंवा त्या
वास्तूत दोष तरी असतो. आजपर्यंत आपण वास्तूमध्ये घर, म्हणजे
ज्या ठिकाणी आपलं कायम वास्तव्य असतं याबद्दल बोलत आलो आहोत. पण आजच्या
आधुनिकीकरणाच्या युगात काम करणार्या पुरुष अन स्त्रियांचा बराचसा वेळ कार्यालयात
अर्थात ऑफिसच्या ठिकाणी जात असतो. नोकरी अथवा व्यवसाय करताना जी जागा आपण प्रत्यक्षात
वापरतो त्याला आपण ऑफिस म्हणूयात! मग तुम्ही एखाद्या बँकेत नोकरी करत असाल, आयटी क्षेत्रात नोकरी करत असाल, स्वतःचं ऑफिस असेल
किंवा दुकान असेल अशा प्रत्येक ठिकाणी वास्तु ही आपलं काम करतच असते. मग ते काम
इष्ट फळ देण्याचं असो किंवा अनिष्ट!आणि त्यानुसारच तुमच्या पदरी यश-अपयश पडत असतं.
ऑफिस हे आपल्या
आर्थिक प्रगतिचे आणि आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारं स्थान आहे. तुम्ही
जिथे काम करत असता त्या वास्तूत जर दोष असतील तर तुम्हाला आर्थिक प्रगती करताना
अडथळे येऊ शकतात. कारण ज्या ठिकाणी आपल्या शारीरिक व बौद्धिक ऊर्जेचा सर्वाधिक
वापर होतो अशी ती जागा असते. त्यामुळे तेथे काम करत असताना जर सुयोग्य स्थिती नसेल
तर त्यातून मिळणारे परिणामही फार सकारात्मक असणार नाहीत. वास्तुस्त्रातील
अभ्यासानुसार,तुम्ही काम करताना कोणत्या दिशेकडे पाठ करून
बसता, तुमचा टेबल ऑफिसच्या कोणत्या कोपर्यात आहे, तुमच्या आजूबाजूला खिडकी-दरवाजा आहे का अशा अनेक छोट्या-मोठ्या बाबींवर
तुमचं त्या क्षेत्रातील यश-अपयश अवलंबून असतं.
तुम्ही असे काही अनुभव
नक्की बघितले असतील की जेथे एखादा व्यक्ति नव्यानेच व्यवसाय सुरू करतो, दुकान सुरू करतो आणि अगदी अल्पावधीतच त्याला यश मिळू लागतं. यामध्ये त्या
व्यक्तीची मेहनत तर नक्कीच असते पण त्याला साथ लाभते ती त्याच्या व्यवसायाच्या
वास्तुचं संपन्न असणं. कधी कधी वास्तूची रचना अनपेक्षितपणे इतकी उत्तम असते की
त्यामूळे अविश्वासनियरित्या वृद्धी होऊ लागते. तुम्ही जर एखाद्या ऑफिसमध्ये नोकरी
करत असाल तर तुमच्या सोबतचा व्यक्ति पुढे निघून जातो, त्याचे
प्रमोशन होतात, बॉससोबत त्याचे फार खटके उडत नाहीत पण तुम्ही
मात्र आहे तिथेच अडकून राहता. तुम्हाला छोट्या-मोठ्या बाबतीत अडचणी येऊ लागतात.
काम करूनही त्याचं श्रेय मिळत नाही आणि अवहेलना सुरू असते. याला काही अंशी स्वभाव
तर जबाबदार तर असतोच पण मुख्य समस्या असते ती त्या वास्तूचा तुमच्यावर होणारा
नकारात्मक परिणाम. कधी-कधी वास्तूची रचना अशी असते की त्यात विशिष्ट एका दिशेला
बसणार्या, कोपर्यात बसणार्या वगैरे व्यक्तींना नकारात्मक
फलप्राप्ती होत असते. म्हणजे दक्षिणेकडील दरवाजाकडे तुमचा टेबल असणे,पश्चिमेकडे खिडकी असणे, बसण्याच्या जागेच्या अगदी वर
बीम असणे किंवा ईशान्य कोपर्यात केबिन असणे. असे अनेक निरीक्षणे वास्तुशास्त्रात नोंदवली
आहेत ज्यावरून कामाच्या ठिकाणी वास्तूची रचना कशी असावी जेणेकरून सकारात्मक परिणाम
दिसून येऊ शकतात. जर अशा काही समस्या असतील तर अगदी छोटे-छोटे बदल करून तुम्हाला
परिस्थितीत सुधारणा घडवून आणता येते. साधं बांबूचं छोटसं रोप आपल्या टेबलवर ठेवणे
किंवा बसायची खुर्ची योग्य दिशेला करून बसणे, लाकडी खुर्ची
वापरणे असे उपाय केले तरी बराच फरक पडू शकतो.
ज्यावेळी भरपूर भांडवल
लावून एखादा व्यवसाय सुरू केला जातो त्यावेळी वास्तुशास्त्राचा अभ्यास करून
त्यानुसार ऑफिस अथवा फॅक्टरीची रचना करणे फायदेशीर ठरते. कारण ऑफिस एकदा स्थापित
केलं की त्यात शक्यतो बदल करणे सोपं असत नाही. त्यामुळेच सुरूवातीलाच जर
वास्तुशास्त्रत तज्ञ व्यक्तीचा सल्ला, मार्गदर्शन घेऊन
ऑफिसची वास्तु उभारली तर त्याचा लाभ होऊ शकतो. बर्याचदा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाचा
भरपूर व्याप असतो. त्यामुळे तेथे काम करणार्या व्यक्तींच्या शारीरिक व मानसिक
आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असतात. अशात कर वास्तुदोष असतील तर तेथे आणखीनच
गंभीर समस्या उद्भवू शकतात. पण त्यात जर वेळीच योग्य बदल केले तर त्याचे सकारात्मक
परिणाम खात्रीशीरपणे दिसून येतील.
वास्तुशास्त्रात
सूर्यप्रकाश, स्वच्छ व खेळती हवा,
गुरुत्वाकर्षण, विविध दिशांकडून येणार्या ऊर्जा यांचा
अभ्यास असतो. आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिशेंचा एक विशिष्ट असा गुणधर्म आहे.
ज्या प्रकारचं ऑफिस आहे, ज्या प्रकारचं तिथे काम होत असतं
त्याप्रमाणे वास्तुची उभारणी केली किंवा त्यात बदल केले तर त्याचा भरपूर फायदा होऊ
शकतो. म्हणजे जर समजा आर्थिक नियोजन किंवा अर्थकारणाशी निगडीत ऑफिस असेल तर त्या
क्षेत्रात पश्चिम दिशा महत्वाची भूमिका बजावत असते. ऑफिसमध्ये Creativity संबंधित काम असतील तर त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना करता येते. वस्तूंची खरेदी-विक्री
संबंधित व्यवहार त्या ऑफिसमधून होत असतील तर उत्तर व पूर्व दिशा महत्वाची ठरते. अशा
अनेक बाबींचा विचार करून ती वास्तु परिपूर्ण असेल तर त्याचा निश्चितच मोठा फायदा
होत असतो. त्यामुळे वास्तुशास्त्राचा योग्य वापर केला तर आर्थिक प्रगती व सामाजिक
प्रतिष्ठा यात यश मिळवणे शक्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा