वास्तूशास्त्र म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडत
असतो. या शब्दाची फोड केली तर आपल्याला त्यातून उत्तर मिळेल. ‘वास्तू’ म्हणजे
मानवनिर्मित अशी जागा जी माणसाने स्वतःच्या निवाऱ्यासाठी कृत्रिमरीत्या बांधलेली
आहे. जगात जी ठिकाणं नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत त्याला आपण
वास्तू म्हणून संबोधत नाही. आता ‘शास्त्र’ म्हणजे काय? तर
वर्षानुवर्षे अभ्यास करून एखादी विद्या संपादन करणे आणि त्या अभ्यासपद्धतीद्वारे
विशिष्ट समस्यांवर उपाययोजना करणे म्हणजे शास्त्र. जसं वैद्यकीयशास्त्र असतं,
संगणकशास्त्र असतं, भौतिकशास्त्र असतं,प्राणीशास्त्र असतं तसच वास्तूशास्त्र! जर आपल्याला शारीरिक अर्थात
आरोग्याची तक्रार असेल तर आपण डॉक्टरकडे जातो आणि तो डॉक्टर (वैद्य) संपूर्ण
तपासणी करून प्रचलित आणि सिद्ध झालेल्या वैद्यकीय शास्त्राच्या आधारे इलाज करत
असतो. या अभ्यासपद्धतीमध्ये वास्तविक घटनांचे निरीक्षण व तर्काधिष्ठित परीक्षण करून
प्रत्यक्षात सिद्ध करण्याजोग्या परिणामांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.त्याचप्रमाणे आपल्या
वास्तूत काही दोष असतील आणि त्याचा दुष्परिणाम होत असेल तर वास्तुशास्त्राच्या प्रचलित
व सिद्ध नियमांनुसार त्यावर उपाययोजना करता येतात.
वास्तुशास्त्रात दहा दिशा, पंचमहाभूते, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय ऊर्जा,
सूर्याची किरणे व वैश्विक ऊर्जेचा प्रामुख्याने अभ्यास करून आपली वास्तू कशी असावी
याबद्दल संकेत दिले आहेत. ज्यावेळी आपण वास्तू स्थापित करतो त्यावेळी या ऊर्जेची
विभागणी होते आणि ऊर्जेचे प्रवाह अस्थिर होतात. अर्थातच या सर्व घटकांचा परिणाम
त्या वास्तूत राहणाऱ्या प्रत्येकावर होत असतो.
ज्याप्रमाणे वाहणार्या नदीला बांध घातला तर प्रवाही नदी थांबते
त्याप्रमाणे वास्तुच्या रचनेमुळे प्रवाही ऊर्जा व इतर घटक तिथे बंदिस्त होतात.
‘वास्तूमध्ये दोष’ असणे म्हणजेच वास्तूच्या रचनेमुळे आणि
वास्तूमधील मांडणीमुळेसतत प्रवाहित असणाऱ्या उर्जेचे असंतुलन. म्हणजे नकारात्मक
ऊर्जेचा वास्तूमध्ये जास्त वावर आणि सकारात्मक ऊर्जेला झालेला प्रतिबंध. ज्यावेळी
त्या वास्तूचा सखोल अभ्यास करून वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार त्याची रचना केली
जाते तेंव्हा हा दोष दूर करता येतो.
उदाहरणार्थ, ईशान्य दिशा सकारात्मक
ऊर्जा देणारी दिशा आहे आणि नैऋत्य दिशा नकारात्मक ऊर्जा देणारी दिशा आहे. मग ईशान्य
दिशेकडून येणार्या सकारात्मक दिशेला कमीत कमी अवरोध व्हावा म्हणून ती दिशा
प्रशस्त व मोकळी ठेवता येईल. याविरुद्ध,नैऋत्य दिशेने येणारी
नकारात्मक उर्जेला प्रतिबंध व्हावा म्हणून तिकडे अडगळ करता येईल.
वास्तुतील दोषामुळे काय काय परिणाम होऊ शकतात हा अत्यंत महत्वाचा
भाग आहे. खरं तर हे प्रत्येक वास्तूच्या रचनेवर अवलंबून असतं. कोणत्या दिशेच्या
असंतुलित असल्याने कोणती नकारात्मक ऊर्जा अधिक निर्माण होते यावर ते अवलंबून असतं.पण
साधारणपणे,
घरामधील माणसांची सततची आरोग्याची समस्या, घरात
पैसे (अर्थात लक्ष्मी) न येणे किंवा पैसे न टिकणे, सततच्या
आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह, लग्न न
जमणे, मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे, करिअर
संबंधित अडचणी, यश न येणे अशा अनेक प्रकारच्या समस्यांना
वास्तूतील दोष कारणीभूत असू शकतात.
बर्याचदा ‘वास्तू दूषित’ असल्यास
त्याचे यापेक्षाही गंभीर परिणाम भोगावे लागतात. मानसिक आरोग्यावर त्याचा तीव्र
परिणाम होऊ शकतो. आरोग्याच्या समस्या जटिल होऊन अकाली मृत्यूही ओढवतात. कितीही
प्रयत्न केले तरी हातातोंडाशी आलेलं यश एका क्षणात अपयशात रूपांतरित होतं. मोठ्या
आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं आणि होत्याचं नव्हतं होतं. वास्तू दूषित असेल
तर असे प्रकार घडतात याला अनेक प्रमाण आहेत, अनेक प्रसंग
आहेत आणि त्याचा अनुभव घेणारे जीवंत माणसंही आहेत.
मानवी शरीर हेसुद्धा पंचमहाभूतांपासूनच बनलेलं आहे आणि मानवी
मनावर अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. लक्षावधी किलोमीटर अंतरावर
असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण लहरींमुळे अथांग सागराला उधाण येतं तर मानवी मनावरही
या वैश्विक ऊर्जा, गुरुत्वाकर्षण इत्यादींचा परिणाम होतच असतो. आपलं शरीर निरोगी राहावं
यासाठीकाळजी घ्यावी लागते तसेच आपण जिथे वास्तव्यास असतो त्या वास्तूचीही काळजी
घेतली तर तीही तितकीच सदृढ राहील. जर शरीराला व्याधी झाली तर डॉक्टरकडे जावं लागतं
तसं वास्तूत दोष असतील तर ते वास्तूशास्त्र तज्ञाकडे जाऊन त्यातील दोष नाहीसे करून
घेणं गरजेचं आहे.
शास्ति च त्रायते च। शिष्यते अनेन।
अर्थात,जी अभ्यासपद्धती आपल्याला शिस्त लावते, आपल्याला
वेळोवेळी मार्गदर्शन करते, आपलं रक्षण करते त्याला शास्त्र
म्हणतात! त्या शास्त्राने दाखवलेल्या मार्गावर चालणे हे आपल्या आदर्श जीवनशैलीचा
भाग आहे.
*-*-*